म्युझिऑलॉजी

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आपापल्या परीने पर्यटन विकासावर भर देत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हा अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारा प्रचंड मोठा उद्योग झालेला आहे. पर्यटनाच्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ऐतिहासिक महत्वाचा विचार करून पुराण वस्तू किंवा ऐतिहासिक वस्तूंची संग्रहालये उभी केलेली असतात. अशी संग्रहालये पाहण्यासाठी लोक फार गर्दी करतात. भरपूर शुल्क आकारून तिथे पर्यटकांना प्रवेश दिला जातो आणि पर्यटकांच्या दृष्टीने विविध ठिकाणची संग्रहालये हा मोठा आकर्षणाचा विषय असतो. परंतु संग्रहालयासाठी आवश्यक वस्तूंचा संग्रह करणे आणि त्यांची व्यवस्थित मांडणी करणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपण पर्यटक म्हणून कुठेही गेलो की, तिथली संग्रहालये पहात असतो, परंतु संग्रहालये उभी करणे हे एवढे कठीण काम असेल असे आपल्या लक्षात येत नाही. प्रत्यक्षात मात्र त्याचे एक विशिष्ट शास्त्र आहे, तंत्र आहे आणि त्या शास्त्राचा, तंत्राचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम आहेत. याच शास्त्राला म्युझिऑलॉजी असे म्हणतात.

आपल्या हातात असलेल्या वस्तूचे ऐतिहासिक महत्व जाणण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. जुन्या काळातल्या अशा वस्तूंची योग्य ती पारख करण्यासाठी काही जुन्या, कालहत झालेल्या भाषा आल्या पाहिजेत, मांडणीचे शास्त्र माहीत पाहिजे. या सर्व गोष्टींचे ज्ञान म्युझिऑलॉजीच्या अभ्यासक्रमात दिले जात असते. कलकत्ता विद्यापीठ आणि उत्तर प्रदेशातील अलिगढचे मुस्लीम विद्यापीठ, त्याचबरोबर दिल्ली येथील नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट या संस्था म्युझिऑलॉजीचे प्रगत शिक्षण देतात. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील हा अभ्यासक्रम एम.एस्सी. इन म्युझिऑलॉजी असा आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र घेऊन मिळविलेली पदवी ही अट आहे.

त्याशिवाय इतिहास, पुरातत्व शास्त्र याही विषयाच्या पदवीधरांना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. प्रवेश देण्यापूर्वी प्रवेश परीक्षा घेतली जाते. इच्छुकांनी www.ame.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. दिल्लीच्या नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट मध्ये एम.ए. इन म्युझिऑलॉजी ही पदवी दिली जाते आणि त्यासाठी प्रवेश घेणार्‍यांना बी. ए., बी.एस्सी. किंवा बी.एफ.ए. या पदव्या मिळवलेल्या असणे आवश्यक असते. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणार्‍यांनाच प्रवेश दिला जातो. इच्छुकांनी www.nmi.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. त्याशिवाय कोलकत्ता विद्यापीठाध्ये एम.ए. इन म्युझिऑलॉजी हा अभ्यासक्रम आहे. त्याच्या प्रवेशाच्या अटी वरीलप्रमाणेच आहेत. इच्छुकांनी www.caluniv.ac.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा. या क्षेत्रामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

Leave a Comment