पुणे,दि.१७ (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसात देशात विदेशी गुंतवणूक या नावाखाली पैसे आले आहेत त्या वीस लाख कोटीपैकी ऐशी टक्के रक्कम ही देशातून बाहेर गेलेल्या काळ्या पैशातीलच आहे आणि त्यातील काही रकमेचा सरकारातील लोकांशी संबंध असण्याशी शक्यता दिसू लागली आहे, असा आरोप आज स्वामी रामदेव व अण्णा हजारे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला.
देशातून बाहेर जाणारा काळा पैसा व भ्रष्टाचार याविरोधात आम्ही स्वतंत्रपणे आंदोलन केले तेंव्हा ते उधळून लावण्यासाठी सरकारने सर्व ते अयोग्य मार्ग अवलंबिले हे आता देशाला कळून चुकले आहे. तरीही पुन्हा नव्या तयारीने आम्ही उभे राहात आहोत. त्यासाठी दि. ९ ऑगस्टरोजी दिल्ली येथे निर्णायक आंदोलन होईल त्यासाठी काही लाख लोक तयार झाले आहेत, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले. तर विद्यमान केन्द्रीय मंत्र्यापैकी पंधराजण भ्रष्टाचारात गुंतले आहेत, त्यावर त्वरीत कारवाई व्हावी यामागणीसाठी दि.२५ जुलै रोजी दिल्ली येथे एक दिवसाचे उपोषण जाहीर झाले आहे, त्यातही दोघे सहभागी होतील, असेही त्यावेळी जाहीर करण्यात आहे.
कारवाई करण्याच्या मंत्र्यांची यादी यापूर्वी चौदा मंत्र्यांची होती ती आता पंधराची कशी काय झाली, असे विचारले असता ते म्हणाले, पूवीं पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे नाव त्यात नव्हते आता त्यांचाही समावेश करण्यात आला आहे, असे श्री अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, आता आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे. पूर्वी माहितीच्या आधिकारासाठी दिल्ली येथे आमरण उपोषण सुरु केले होते त्याचे जसे जसे दिवस वाढू लागले तसतसे वातावरण बदलून सरकारला माहितीच्या आधिकाराचा कायदा करावा लागला, तीच वेळ आता आली आहे आणि हळूहळू त्याच पद्धतीने आंदोलन आकारते आहेत,’
सध्या बाबा रामदेव व अण्णा हजारे हे प्रत्येक राज्यात आंदोलनाच्या प्रचारासाठी जात आहेत आज पुण्यात त्यांची महाराष्ट्र पातळीवरील बैठक होती. त्या निमित्ताने पुण्यात आले होते. या प्रसंगी काही प्रश्नांना उत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले, सध्या जी प्रचंड महागाई वाढते आहे त्याचे महत्वाचे कारण हे भ्रष्टाचार व काळा पैसा स्वरुपात देशाबाहेर जात असलेला प्रचंड पैसा आहे. तो जोपर्यंत परत येत नाही तो पर्यंत येथील विकासाला गती येणार नाही. गेल्या काही दिवसाच्या तयारीमुळे आता आंदोलनाची चांगली तयारी झाली आहे.