नागपूर दि.१८ – भारतीयांनी परदेशी बँकात दडविलेला काळा पैसा परत देशात आणण्यासाठी आंदोलन करत असलेले योगगुरू रामदेव बाबा यांनी आगामी लोकसभा निवडणूका लढविण्याचे संकेत नागपूरात दिले आहेत. महिनाभरात या संबंधीचा नक्की निर्णय जाहीर केला जाईल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
दिल्ली येथे ९ ऑगस्ट म्हणजे क्रांतीदिनापासून रामदेवबाबा काळा पैशांसंदर्भात तर टीम अण्णा जनलोकपाल विधेयक आणि भ्रष्टाचार विरोधात आंदोलन सुरू करणार आहेत. रामदेवबाबा त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा यासाठी देशभर फिरून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच या आंदोलनाबाबत जनजागृतीही करत आहेत. सत्तेमध्ये परिवर्तन गरजेचे असल्याचे त्यांचे मत असून भारत स्वाभिमान संघटना निवडणूक प्रचारात उतरली तर मुख्य राजकीय प्रवाहात सहभागी होऊ असे संकेतही रामदेवबाबांनी दिले आहेत. दिल्लीतील आंदोलन पार पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकींबाबत निर्णय घेणार असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि जनलोकपाल बिलासाठी आंदोलनात उतरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि रामदेवबाबा एकत्र येत आहेत मात्र अण्णांनी यापूर्वीच चांगले लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत कारण निवडणुकांसाठी लागणारा प्रचंड पैसा त्यांच्याकडे नसतो असे मत व्यक्त केले होते. त्यावर बोलताना रामदेवबाबा म्हणाले की परिस्थितीने सर्व कांही शक्य होते कारण बदल हे निरंतर घडतच असतात.