इस्त्रायली खजुराचे गुजराथेत विक्रमी उत्पादन

कच्छ दि.१८ – देशातील खजूर उत्पादनात एकमेव असलेल्या गुजराथेतील कच्छ भागात इस्त्रायली खजूराची प्रयत्नपूर्वक केलेली लागवड अतिशय यशस्वी ठरली आहे. बारही जातीचा हा खजूर असून गेल्या १० वर्षात करण्यात आलेल्या १७ हजार हेक्टर खजूर लागवडीपैकी १८०० हेक्टर क्षेत्रावर खजूर झाडे लावण्यात आली आहेत. त्यातून मिळत असलेले प्रचंड उत्पादन पाहून आता पाटन व बन्सकांथा जिल्ह्यातील शेतकरीही खजूर लागवडीकडे वळले असल्याचे सांगण्यात आले आहे.

याविषयी बोलताना गुजराथ कृषी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक एन.के सिंग म्हणाले की गेल्या १० वर्षात गुजराथेतील खजूरपिकाखालचे क्षेत्र ९९०० हेक्टरवरून १६९५० हेक्टरवर गेले आहे. खजूराच्या जगात ३ हजार जाती आहेत. पैकी इस्त्रायलच्या बारही जातीच्या खजुराची उती संवर्धन केलेली रोपे १८०० हेक्टर जमिनीवर लावण्यात आली आहेत.या रोपाची किमत ३ हजार रूपये असून सरकार प्रत्येक रोपामागे १२५० रू. सबसिडी देते. खजुराचे एक झाड दरवर्षाला १५०० किलो उत्पादन देते. जुलै ते ऑगस्ट हा उत्पादनाचा काळ असतो. कच्छ भागात खजुर उत्पादन पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाले असून ते यंदा १.५ लाख मेट्रिक टनावर गेले आहे. गुजराथेत उत्पादित होणार्‍या एकूण खजुर उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन एकट्या कच्छमध्ये निघत आहे. परिणामी गेल्या तीन वर्षात इस्त्रायली खजूर रोपांची मागणीही वाढत चालली आहे असेही ते म्हणाले.