नाझी अधिकार्‍यावर कारवाईसाठी हंगेरीत निदर्शने

बूडापेस्ट दि.१७- दुसर्‍या जागतिक युद्धाच्या काळात ज्यूंवर अत्याचार करणार्‍या नाझी युद्ध गुन्हेगारावर कडक कारवाई करावी यासाठी आज हंगेरीतील ज्यूंनी निदर्शने करून अधिकार्‍यांवर दबाव आणला असल्याचे समजते.

याविषयीची हकीकत अशी की दुसर्‍या जागतिक युद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर हिटलरच्या नाझी अधिकार्‍यांनी देशातून पळून जाऊन दुसर्‍या देशांत आश्रय घेतला होता. नाझींनी या युद्धात ज्यू लोकांचे जे भीषण हत्याकांड केले त्याचा बदला म्हणून अजूनही या अधिकार्‍यांचा शोध घेण्याचे व त्यांना शिक्षा करण्याचे काम सुरूच आहे. इस्त्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेने असे कित्येक नाझी हूडकून काढून त्यांचा निकाल लावला आहे. हंगेरीत  छुपा आश्रय घेतलेल्या लाडोसलाऊ सॅटारीचा पत्ता तेथील ज्यूंना लागला असून त्याच्यावर कडक कारवाई करावी यासाठी त्यांनी निदर्शने केली. ज्यूइस्ट राईट ऑरगनायझेशनच्या कार्यालयासमोरच ही निदर्शने करण्यात आली असून तेथील अधिकार्‍यांवर निदर्शकांनी कारवाईसाठी दबाव आणला आहे. सॅटारीने १९४४ साली युद्धकाळात किमान १५ हजार ज्यूंना छळछावणीत डांबल्याची माहिती उघड झाली आहे.

मात्र ज्युईश राईट संस्थेच्या अधिकार्‍यांनी ही घटना घडून आता फार मोठा काळ लोटला असल्याचे व ही घटना दुसर्‍या देशात घडली असल्याचे सांगून त्याच्यावर कारवाई करणे अवघड आहे असे नमूद केले आहे. सॅटारी हा नाझी अधिकारी सध्या ९१ वर्षांचा असल्यानेही त्याच्यावर कारवाई करणे योग्य नसल्याचे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे असे समजते.