राहुल गांधी नव्या भूमिकेसाठी सज्ज – दिग्विजय सिंह

नवी दिल्ली, दि. १६ – काँग्रेसचे ’बोल बच्चन’ नेते दिग्विजय सिंह पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. सप्टेंबर २०१२ पासून राहुल गांधी नव्या आणि मोठ्या भूमिकेत दिसतील, असे वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून नेमकी कोणती मोठी भूमिका राहुल गांधी पार पाडणार आहेत, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रपती निवडणूक होऊ द्या. राहुल गांधी एका मोठ्या भूमिकेत दिसतील. राहुल गांधींच्या नव्या जबाबदारीसाठी काँग्रेसमध्ये तयारी सुरु झाली आहे. सप्टेंबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल. राहुल गांधींनी मोठी जबाबदारी घ्यावी, अशी काँग्रेसमध्ये सर्वांची इच्छा आहे असे एका वृत्तवाहिनीवर बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले.

यापूर्वी सलमान खुर्शीद आणि एस. एम. कृष्णा यांनीही राहुल गांधींनी मोठी जबाबदारी घ्यावी, त्यांनी कॅबिनेटमध्ये सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले होते.