वांगी, टोमॅटो आणि मिरच्या एकाच रोपावर…

जालना, दि. १३ – एकाच रोपावर वांगी, मिरची आणि टोमॅटो पिकवून दाखवायची किमया कृषी शास्त्रज्ञ डॉ. श्रीराम पालवे यांनी केली आहे. जालन्यातील `जिंदाल क्रॉप सायन्स’ या कंपनीत फळवर्गीय पिकावर संशोधन करणार्‍या डॉ. पालवे यांनी अखंड संशोधनातून ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करुन दाखवली आहे.

ग्राफटिंग म्हणजेच कलम करून त्यांनी वांग्याच्या झाडावर मिरची आणि टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटो आणि मिरचीवरील रोगांचा प्रादुर्भावचा अभ्यास करताना त्यांनी वांग्यातील रोगप्रतिकारक शक्तीचा टोमॅटो आणि मिरचीच्या रोपांना फायदा व्हावा, या उद्देशाने वांग्याच्या झाडावर हा प्रयोग केला. वांगी, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जुनकीय गुणधर्म सारखे असल्याने हा त्रिवेणी संगम एकाच झाडावर पाहायला मिळत आहे.

आपल्या कंपनीतील फार्मवर त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जवळपास २५ झाडावर ग्राफटिंग केले. त्यातली १५ झाडे जगविण्यात त्यांना यश आले. या पंधरा झाडातील आठ रोपं १४ महिन्यांपेक्षा अधिक काळ जिवंत राहिली आहेत. या रोपट्यांवर कोणता रोगही पडला नाही.

हा प्रयोग करताना त्यांनी पाचर कलम पद्धतीचा वापर केला. वांग्याच्या सशक्त रोपावर निरोगी मिरची आणि टोमॅटोच्या फांद्या घेऊन पाचर पद्धतीने त्यांनी याचे कलम केले.

डॉ. पालवे यांनी केलेले हे संशोधन भाजीपाला आणि फळवर्गीय पीकांसाठी मोठे फायद्याचे ठरणार आहे. भविष्यात या प्रयोगातून कमी पाण्यावर तग धरण्याचा वांग्याचा गुणधर्म मिरची आणि टोमॅटो मध्ये येऊ शकतो. तसेच त्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा टाळता येईल.