
लंडन दि.१३- ब्रिटनचा युवराज प्रिन्स विल्यम्स व त्याची पत्नी लेडी केट मिडलटन यांच्या हनिमूनवरील ट्रीपचे खासगी फोटो ऑस्ट्रेलियन मासिकाने प्रसिद्ध केले असून त्यावर ब्रिटनच्या राजघराण्याने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

लंडन दि.१३- ब्रिटनचा युवराज प्रिन्स विल्यम्स व त्याची पत्नी लेडी केट मिडलटन यांच्या हनिमूनवरील ट्रीपचे खासगी फोटो ऑस्ट्रेलियन मासिकाने प्रसिद्ध केले असून त्यावर ब्रिटनच्या राजघराण्याने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
ड्यूक अॅन्ड डचेस ऑफ क्रेंबिज असलेले विल्यम्स व केट वर्षापूर्वी विवाहबद्ध झाले असून त्यानंतर ते १० दिवसांच्या हनीमूनसाठी नॉर्थ आयलंडला गेले असताना हे फोटो चोरून काढण्यात आले असल्याचे समजते. राजघराण्यातील या जोडप्याचे खासगी फोटो प्रसिद्ध न करण्याचा अलिखित करार प्रसारमाध्यमांत आहे. ते दोघे ज्या बीचवर गेले होते तेथे कोस्टगार्डचा खडा पहारा होता. मात्र ज्या अज्ञात फोटोग्राफरने हे फोटो घेतले त्याने या गार्डना चकवा दिला आहे. ऑस्ट्रेलियातील वुमन्स डे या मासिकाने विल्यम्स व केट यांचा अतिशय तोकड्या पोहण्याच्या पोशाखातला फोटा मुख्यपृष्ठावरच छापला असून आत आणखी १५ फोटो छापले आहेत. समुद्रकिनार्यावर हे जोडपे हातात हात घालून चालले असल्याचा हा फोटो आहे. लाँग लेन्सच्या सहाय्याने हे फोटो घेण्यात आले आहेत.
या फोटोंमुळे विल्यम्स व केट भयंकर अपसेट झाले आहेत तर राजघराण्याने या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. असले फोटो प्रसिद्ध करून या दोघांच्या खासगी जीवनावरच आक्रमण कले गेले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.विशेषतः पापाराझींच्या पाठलागामुळेच लेडी डायनाचा पॅरिस मध्ये १९९७ साली कार अपघातात मृत्यू झाला होता व तेव्हापासून विल्यम्सने आपली पत्नी केट हिला कटाक्षाने प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
रॉयल फॅमिलीबाबत असे फोटो छापण्याचा उद्योग ऑस्टेलियन मासिकांनी यापूर्वीही केला असून २००८ मध्ये प्रिन्स हॅरी अफगाणिस्तानात नोकरी करत असल्याचे फोटो बंदी असतानाही प्रकाशित करण्यात आले होते.