युवराजांना मागणी, मिळणार १५ कोटी हुंडा

नवी दिल्ली दि. १२ – काँग्रेसचे युवराज राहुल गांधीं आपले जावई व्हावेत यासाठी  जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या महिलेने त्यांना  १५ कोटी हुंडा देण्याची तयारी दाखवली आहे.
राहुल जावई म्हणून मिळावा, यासाठी तिने थेट वरुणराजालाच साकडे घातले आहे. नऊ जुलैपासून तिने दिल्लीतील जंतरमंतरवर भर पावसात उपोषण आणि मौनव्रत सुरू केले आहे. ’राहुल गांधी से अपनी बेटी के रिश्ते की मांग’, असा उल्लेख असलेल्या फलकाखालीच तिने ठाण मांडले आहे.

ओम शांती शर्मा नावाची ही महिला जयपूरमधील आहे. आपल्या सासरकडून मिळणार्‍या मालमत्तेतील १५ कोटी रुपयांचा हिस्सा आपण आपल्या जावयाच्या (राहुल गांधी) नावावर करणार असल्याचे तिने लिहिले आहे. या व्यतिरिक्त ती काहीही बोलायला तयार नाही. जंतर- मंतरवर आंदोलन करत असलेले संतोष मुरत सिंग यांनी ही माहिती दिली असून  ते स्वतः आपण जिवंत आहोत, हे सिद्ध करण्याची लढाई लढत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या लेखी ते मृत्यू पावले आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही महिला मनोरुग्ण असून, ती अतिशय अशक्य अशा मागणीवर अडून बसली आहे. नवी दिल्लीचे पोलिस उपायुक्त के. सी. द्विवेदी यांनी मात्र चाणाक्षपणे यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.