मुंबई दि.१२ – ‘रुस्तम-ए-हिद’ ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दारासिंग यांचे(वय ८३) गुरुवारी सकाळी ७.३० वाजता निधन झाल्याचे त्यांचे चिरंजीव विदू दारासिंग यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध पैलवान, ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांचे निधन
हृदयविकाराच्या झटक्यानंतर कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात दारासिंग यांना दाखल करण्यात आले होते. तथापि, त्यांची प्रकृती सुधारण्याच्या पलीकडे गेल्याने बुधवारी रात्री त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मेंदूची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती, असे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले.
जागतिक विजेते असलेले पैलवान दारासिंग यांनी १९६०च्या दशकात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘जब वुई मेट’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट होय.
दारासिंग यांचे मूळ नाव गुरुमुख असून त्यांचा जन्म अमृतसर जिल्ह्यातील धर्मूचक खेड्यात १९ नोव्हेंबर १९२८ रोजी एका जाट कुटुंबात झाला होता. दारासिंग रंधावा हे त्यांचे नाव असून १९६२ मध्ये हिदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी ते पैलवान होते. ऑगस्ट २००३ ते ऑगस्ट २००९ या काळात ते भाजपतर्फे राज्यसभेवर नियुक्त झाले होते. व्यावसायिक पैलवान म्हणून त्यांनी अतिपूर्वेकडील सर्व देशांचा दौरा केला होता. १९४७ मध्ये सिंगापूरच्या स्पर्धेत त्यांनी ‘चॅम्पियन ऑफ मलेशिया’ किताब मिळविला होता. १९५२ मध्ये ते भारतात परतले व १९५४ मध्ये ‘इंडियन चॅम्पियन’ बनले.
राष्ट्रकुलातील सर्व देशांतून त्यांनी दौरा केला व ओरिएंटल चॅम्पियन किंग काँग, जॉर्ज गॉर्डिएंको(कॅनडा), जॉन डिसिल्व्हा(न्यूझीलंड) आदिचा पराभव केला. १९५९ मध्ये ते ‘राष्ट्रकुल विजेते’ बनले. कुस्तीत एकदाही पराभूत न होता दारासिंग१९८३ मध्ये कुस्तीक्षेत्रातून निवृत्त झाले.
त्यांच्या गाजलेल्या कुस्त्यांमध्ये चॅम्पियन ऑफ पाकिस्ता माजिद अक्रा, शेन अली व तारिक अली(पाकिस्तान), राजपुत्र कुमाली(चॅम्पियन ऑफ आफ्रिका), जपानी ग्रेट रिकीडोजन, युरोपियन चॅम्पियन बिल रॉबिन्सन, चॅम्पियन ऑफ इंग्लंड पॅट्रोच, डेव्हिड टेलर, डॅनी लिच, मॅन माऊंटन जॅक, कॅसवेल जॅक, जॉर्ज बर्जर्स, स्काय ही इत्यादि समावेश आहे. या सर्व लढतीत दारासिंग यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले होते.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, चौधरी चरणसिह, मोरारजी देसाई, चंद्रशेखर, राजीव गांधी तसेच माजी राष्ट्रपती झैलसिंग यांनी दारासिंग यांच्या कुस्तीच्या लढती पाहून त्यांची पाठ थोपटली होती. ज्या कुस्तीच्या लढतीत त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती, ती लढत नवी दिल्ली येथे राजीव गांधींच्या उपस्थितीत झाली होती.
१९६० ते ७० हे दशक दारासिंग यांनी ‘स्टंट चित्रपटांचा बादशहा’ म्हणून गाजविले. अभिनेत्री मुमताजला चित्रपटसृष्टीत आणण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. मुमताजबरोबर त्यांनी १६ हिन्दी चित्रपटात काम केले होते. नंतर, ते छोट्या पडद्याकडे म्हणजे, दूरचित्रवाणीकडे वळाले. १९८०-९० च्या दशकात त्यांनी ‘रामायण’ मालिकेत हनुमानाची भूमिका अजरामर केली. ‘हद कर दी’ ही त्यांची मालिकाही खूप गाजली. त्यांनी सुमारे १०० पेक्षा जास्त चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.
