अॅपल आयपॅडचे नवीन व्हर्जन जुलैत चीनच्या बाजारात

न्यूयॉर्क दि.१२- अॅपलच्या नवीन आयपॅडची विक्री २० जुलैनंतर चीनच्या बाजारपेठेत सुरू करण्यात येणार आहे. चीनच्या शेनझेन प्रोव्ह्यू कंपनीकडून ब्रँडनेमच्या मालकीच्या वादापोटी ६० दशलक्ष डॉलर्सचा समझौता अॅपलने याच आयपॅडसाठी केला आहे. या नवीन आयपॅडची किंमत कंपनीने ४९९ डॉलर्स इतकी ठेवली असून आयपॅड टू ची किंमत कमी करून ३९९ डॉलर्सवर आणली आहे. या टॅब्लेटची विक्री अॅपलच्या स्टोअर्समधून ऑनलाईन केली जाणार आहे तसेच वितरकांकडूनही ते विकले जाणार आहेत.

विशेष म्हणजे अॅपलने आपली उत्पादने अन्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये नेहमीच उशीरा आणली आहेत. नवीन आयपॅडचे मॉडेलही अमेरिका तसेच अन्य कित्येक देशात मार्च महिन्यातच दाखल झाले आहे. शार्प स्क्रीन व वेगवान प्रोसेसिंग चीप ही याची वैशिष्ठे आहेत. गुगल आणि मायक्रोसॉफ्टने त्यांचे टॅब्लेट बाजारात आणून अॅपलपुढे स्पर्धा निर्माण केली असली तरी आजही टॅब्लेट बाजारात अॅपलचेच वर्चस्व आहे.

चीनी कंपनी शेनझेन प्रोव्ह्यूने ब्रँडनेमवरून निर्माण केलेल्या वादामुळे आयपॅडच्या विक्रीलाच आव्हान दिले गेले होते. अमेरिकेनंतर चीन हीच अॅपलसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने अॅपलसाठी चीनमधली विक्री न होणे हे मोठेच तोट्याचे ठरले असते. अॅपलच्या कॅलिफार्निया येथील मुख्यालयातून आयपॅडचे हक्क चीनी कंपनीकडून २००९ सालीच घेतल्याचा पुनरूच्चार करण्यात आला आहे मात्र चीनी न्यायालयाने चीनीमधले हक्क हस्तांतरीत न झाल्याचा निर्णय दिल्याने या कंपनीशी ६० दशलक्ष डॉलर्स देऊन समझोता करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.