बंगळुरू दि.१२ – कर्नाटक मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास काही तास बाकी राहिलेले असताना जगदीश शेट्टार यांच्याविरोधात लोकायुक्त न्यायालयात तक्रार करण्यात आलेली आहे. सहा वर्षांपूर्वी भूखंडाची अधिसूचवा रद्द करण्यात त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
लोकायुक्त न्यायाधीश एन. के. सुधीन्द्र राव यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यात म्हटले आहे की, २००६ मध्ये महसूल मंत्री असताना शेट्टार यांनी १७८ एकर भूखंडाची अधिसूचना रद्द केल्याने सरकारी तिजोरीस २५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते एस. एम. चेतन यांनी ही तक्रार केली आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये शेट्टार यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, अशी मागणी केली आहे. शेट्टार यांचा आजच मुख्यमंत्रिपदी शपथविधी होणार आहे.
न्यायाधीशांनी या तक्रारीची सुनावणी २१ जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे. न्यायालयीन वादात अडकलेले शेट्टार हे भाजपचे नवे नेते आहेत.