ब्रेट ली उर्फ बिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्याअगोदरच लीने ही घोषणा ट्वीटवरून केली असल्याने त्याचे चाहते निराश झाले आहेत. लीने ही घोषणा करून त्याच्या निवृत्तीसंबंधीच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

ली ट्वीटवर म्हणतो की  तेरा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असून आता मी निवृत्त होत आहे. सर्व चाहत्यांनी दिलेले प्रेम आणि पाठिबा याबद्दल त्यांना धन्यवाद. अर्थात ली आयपीएल आणि ऑस्ट्रेलियात दरवर्षी होणार्‍या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. ग्लेन मॅकग्रा नंतर सर्वाधिक बळी घेणारा ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियाचा दुसर्‍या क्रमांकाचा बोलर आहे.२२१ सामन्यात त्याने ३८० विकेट घेतल्या आहेत. २०१० सालीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

लीच्या निवृत्तीमागे दुखापत हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच इंग्लंड येथे झालेल्या सामन्यात त्याला दुखापत झाल्याने मायदेशी परतावे लागले होते. अर्थात १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक गंभीर दुखापतींना तोंड दिले आहे मात्र दरवेळी त्याने त्यावर मात करत यशस्वी पुनरागमनही केले आहे. मात्र सततच्या दुखापतींनी तो सध्या त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियन संघात ली बिंगा या टोपणनावाने ओळखला जातो.

Leave a Comment