दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या `टाईम’ या साप्ताहिकाने छापलेल्या मनमोहनसिंग यांच्या विरोधातील मजकुरावर वादळ उठले होते. ते वादळ शांत होण्याच्या आतच केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी नवे वादळ उठवले असून कॉंग्रेस पक्ष आणि त्याचे नेते यांच्या असमर्थतेवर बोट ठेवले आहे. टाईमने पंतप्रधान मनमोहनसिंग यांना नाकामयाब पंतप्रधान ठरवले होते आणि त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांची बरीच धावपळ सुरू झाली होती. टाईम साप्ताहिकाने मनमोहनसिंग यांच्या अकार्यक्षमतेचे माप त्यांच्या पदरात टाकताना त्यांच्या असमर्थतेच्या बर्याच गोष्टी उद्धृत केल्या होत्या. त्यात मनमोहनसिंग यांचा आपल्या मंत्र्यांवर वचक नाही आणि हे मंत्री त्यांच्या नियंत्रणात नाहीत, असे म्हटले होते. टाईमचे हे म्हणणे किती खरे आहे हे ताबडतोब सिद्ध केले पाहिजे, असे सलमान खुर्शीद यांना वाटले असावे. म्हणून त्यांनी लगेच दोन दिवसात त्याचे प्रत्यंतर आणून दिले.
आपले सरकार आणि कॉंग्रेस पक्ष दिशाहीन आहे, असे विश्लेषण त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडले. पक्षाला दिशा नाही, राहुल गांधी धाडसाने सरकारची सूत्रे हाती घेत नाहीत आणि देशाचे भवितव्य चुकीच्या हातात आहे असे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारमधला एक मंत्रीच जर आपल्या सरकारची अशी कुंडली मांडत असेल तर ती मांडणी निश्चितच धक्कादायक ठरू शकते आणि तिच्यामुळे खळबळ उडू शकते. तशी खळबळ उडाली आणि सलमान खुर्शीद यांना आपण काय बोलून गेलो याचे भान आले. त्यांना पक्षातून स्पष्टीकरण देण्याचा आदेश देण्यात आला. अशावेळी पुढार्यांना, आपण असे बोललोच नाही असे म्हणून खुलासा करण्याची सवय असते. परंतु सध्या मुलाखती घेताना इतक्या प्रगत साधनांचा वापर केला जात आहे की, अशा खुलासाखोर मंत्र्यांना आपण असे बोललोच नाही, अशी सारवासारव करण्याची संधीच राहिलेली नाही. खुर्शीद यांच्या बाबतीत असेच झाले. त्यांनी खुलासा तर केला, पण तो खुलासा खोटा ठरेल म्हणून आपल्या म्हणण्याचा सकारात्मक अर्थ घ्यावा, अशी शब्दांच्या कोलांट्या उड्या घ्यायला सुरुवात केली. एक वेळ आपण सलमान खुर्शीद यांचे म्हणणे मान्य करू. कारण माणूस एकच वाक्य उच्चारतो आणि त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारांनी घेतात. त्याच एका सामान्य वाक्याचा कोणी भलताच अर्थ काढला तर त्या बोलणार्यावर तो अन्याय ठरतो. म्हणून सलमान खुर्शीद म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या वाक्यांचा सकारात्मक अर्थ आपण घेऊ या. अर्थ वाटेल तसा घेता येतो, पण उच्चारलेले शब्द बदलता येत नाहीत. त्यामुळे आधी आपण खुर्शीद काय म्हणाले ते शब्दश: समजून घेऊ. त्यांची वाक्ये अशी आहेत, ‘‘सध्याच्या परिस्थितीत समोर असलेल्या सर्व समावेशक आव्हानांचा सामना करण्यासाठी नव्या विचारप्रणालीची गरज आहे.’’
‘‘२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून आपण नेमकी कोणती भूमिका घ्यावी याचे मार्गदर्शन स्पष्टपणे मिळायला हवे.’’
‘‘राहुल गांधी हे कॉंग्रेस पक्षातील नंबर दोनचे नेते आहेत. ते पक्षकार्यात सक्रीय असले तरी अजूनही प्रत्यक्ष जबाबदारी घेत नाहीत. नंबर दोनचे नेते म्हणून जी तयारी करायला हवी ती त्यांनी केलेली नाही.’’ त्यांनी काढलेले हे उद्गार शब्दश: असे आहेत. त्याचा सकारात्मक अर्थ घ्यायचा झाला तर तो असा घेता येईल की, कॉंग्रेसला नव्या विचार प्रणालीची गरज आहे, निवडणुकीला सामोरे जाताना भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि राहुल गांधी यांनी आता नंबर दोनचे नेते म्हणून तयारी करायला हवी. मात्र असा सकारात्मक अर्थ काढला तर ही वाक्ये म्हणजे कॉंग्रेसविषयी असलेली अपेक्षा आहे. भूमिका स्पष्ट असायला हवी याचा अर्थ ती आता स्पष्ट नाही. नवीन विचारसरणीची गरज आहे याचा अर्थ आता नवी विचारसरणी समोर नाही. राहुल गांधींनी तयारी केली पाहिजे याचा अर्थ राहुल गांधींची अजून तयारी नाही, असा काढला तर तो अर्थ नकारात्मक ठरत नाही.
सलमान खुर्शीद ज्या सकारात्मक अपेक्षा व्यक्त करत आहेत त्या अपेक्षांची ती पार्श्वभूमी आहे, त्या अपेक्षा व्यक्त करण्यामागचे ते कारण आहे. मला श्रीमंत झाले पाहिजे, असे एखादा माणूस म्हणतो त्याचा अर्थ तो आता श्रीमंत नाही असाच असतो. तो आता गरीब आहे म्हणूनच त्याला श्रीमंत व्हावेसे वाटलेले असते. तेव्हा तो आता गरीब आहे असा अर्थ कोणी काढला तर तो अर्थ चुकीचा ठरत नाही, तर त्याला श्रीमंत व्हावेसे वाटण्यामागचे ते कारण असते. तशीच अवस्था कॉंग्रेस पक्षाची आहे, हे काही सलमान खुर्शीद यांनी सांगितल्यामुळे कळले आहे असे काही नाही. कॉंग्रेसला दिशा नाही, नेतृत्व नाही, राहुल गांधींची क्षमता सुमार आहे हे अनेकदा दिसून आलेले आहे. त्यामुळे सलमान खुर्शीद यांनी आपण असे म्हटलेलेच नाही असे जरी म्हटले तरी वस्तुस्थिती काही लपत नाही.
मात्र कॉंग्रेस पक्षाच्या या दूरवस्थेच्या बाबतीत पक्षातच खदखद सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती स्फोटक वस्तुस्थिती आता व्यक्त व्हायला लागली आहे हे मात्र त्यातून जरूर समजते. सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता हळू हळू एकेक मंत्री बोलायला लागेल.