खुनाचे हत्यार सापडले, आता अहवालाची प्रतिक्षा

मुंबई दि.११ – बॉलिवूड अभिनेत्री लैला खान व कुटुंबाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली लोखंडी सळई, चाकू पोलिसांना मिळाले असून ही हत्यारे  जप्त करण्यात आली आहेत. लैलाचा मोबाईल, गाडीची नंबर प्लेट इगतपुरीत मिळाली व  उंटदरीतील फार्महाऊस परिसरात दागिने आणि स्त्रीयांची कपडे सापडले आहेत. ते लैलासह तिची आई, बहिणीचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मुंबई पोलिसांची टीम नाशिकहून मुंबईत परतली आहे. पोलिसांना सापडले सहा सांगाडे हे लैला आणि कुटुंबियांचेच आहेत का? असा प्रश्न अद्याप कायम असून ते  फॉरेंसिक आणि अनॉटॉमी अहवालातून स्पष्ट होणार आहे.

लैलाचा सावत्र पिता परवेझ टाक याने दिलेल्या माहितीची पोलिसांना तपास कार्यात मोठी मदत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. लैलाच्या प्रॉपर्टीसाठी तिच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबियांची हत्या झाल्याची शक्यताही  वर्तवली जात आहे.

पाक अभिनेत्री लैला खानसह कुटुंबीयांची हत्या केल्याचा गौप्यस्फोट तिचा सावत्र पिता परवेझ टाक याने केला होता. त्यानंतर परवेझला जम्मू काश्मीरहून मुंबईला आणण्यात आले होते. मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसच्या पथकाने मंगळवारी इगतपुरीत विशेष बंदोबस्तात उंटदरीतील लैलाच्या फार्म हाऊसमध्ये  आणले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी खोदकाम सुरू केले होते. तेव्हा एका खड्ड्यात चार तर दुसर्‍या खड्ड्यात दोन सांगाडे रात्री उशीरा सापडले. त्यातील तीन सांगाडे हे महिलांचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उंटदरीतील लैलाच्या फार्महाऊस परिसरात चार कि.मी. अंतरापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.