होमिओपॅथिक डॉक्टरांचा तीन दिवस संप

पुणे, दि. ११ – होमिओपॅथीक डॉक्टरांना रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशनर म्हणून मान्यता मिळावी, यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथीक जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. १०, ११ आणि १२ असे तीन दिवस हा संप असून, या तीन दिवसांत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास हा संप बेमुदत सुरू राहिल, असा इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

आयुर्वेदिक व होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनवर ऍलोपॅथी औषधे देऊन नये असा आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिल्यामुळे आयुर्वेद व होमिओपॅथीक डॉक्टरांमध्ये असंतोष पसरला आहे. प्रशासनाच्या या आदेशाचा निषेध करत राज्यातील सर्व आयुर्वेद व होमिओपॅथीक डॉक्टरांनी तीन दिवसाचा संप पुकारला आहे.

महाराष्ट्र होमिओपॅथीक जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या वतीने सकाळी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथीक जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जनरल प्रॅक्टीसनर्स या डॉक्टरांना प्राथमिक व आपतकालीन वैद्यकीय सेवा पुरविताना ऍलोपॅथी औषधे वापरण्यास परवानगी द्यावी, सर्व डॉक्टरांना आर.एम.पी (रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टीसनर्स) मान्यता मिळावी, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट महाराष्ट्र राज्यात लागू करण्यापूर्वी सर्व डॉक्टरांच्या संघटनांना विश्वासात घ्यावे, अशा अनेक मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आलेल्या आहेत.