ऑडीची घोडदौड ; बीएमडब्ल्यूला टाकले मागे

नवी दिल्ली दि.११ – गेली तीन वर्षे भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जर्मनीच्या तीन महाकाय कार उत्पादक कंपन्यांतच आता विक्री शर्यत सुरू झाली आहे. गेली तीन वर्षे सतत प्रथम क्रमांकावर असणारी बीएमडब्ल्यू , दुसर्‍या क्रमांकावर असणारी मर्सिडीज बेंझ, आणि तिसर्‍या क्रमांकावर असणारी ऑडी यांच्यातील ही रेस उत्कंठावर्धक होत चालली आहे. कांही महिन्यांपूर्वीच मर्सिडीजला मागे टाकलेल्या ऑडीने आता टॉप गिअर बीएमडब्ल्यूलाही मागे टाकले असून जून २०१२ मध्ये ७५९ गाड्या विकून या स्पर्धेत टॉपचे स्थान प्राप्त केले आहे. भारतीय बाजारात पहिल्यांदाच ऑडीने ही कामगिरी बजावली आहे. जूनमध्ये बीएमडब्ल्यूने ७५० गाड्या विकल्या आहेत.

विशेष म्हणजे कार उद्योग सध्या मंदीच्या फेर्‍यातून जात असताना ऑडीने हे यश मिळविले आहे. पेट्रोल दरवाढ, व्याजदरातील वाढ यामुळे कार उद्योगाच्या विकासाला खीळ बसली आहे. मात्र ऑडीचे देशातील भक्कम वितरक जाळे आणि उत्युत्कृष्ट विक्री पश्चात सेवा भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली असून गाडी विक्रीतील वाढीचे ते मुख्य कारण आहे असे कंपनीतील वरीष्ठांचे म्हणणे आहे. २०१२ सालात आपण लीडर असू अशी अपेक्षा नसतानाही गेल्या महिन्यातील विक्रीचे आकडे उत्साहवर्धक असल्याचे या अधिकार्‍यांनी सागितले.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर (एसआयएएम)च्या माहितीनुसार ऑडीची पहिल्या तीन महिन्यातील विक्री वाढलेली होतीच पण नंतरच्या तीन महिन्यात त्यात ५२ टक्के वाढ नोंदविली गेली. या काळात कंपनीने १९०८ गाड्या विकल्या. तुलनेत बीएमडब्ल्यूच्या विक्रीत १२.१६ टक्के तर मर्सिडीजच्या विक्रीत २४.४१ टक्के घट नोंदविली गेली आहे.