`टाईम’चे म्हणणे योग्यच

भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा एक लेख अमेरिकेतल्या टाईम नावाच्या साप्ताहिकाने प्रसिद्ध केला आहे. पण त्यावरून भारतातल्या अनेक विचारवंतांमध्ये, पत्रकारांमध्ये आणि नेत्यांमध्ये चर्चेला आणि वादाला उधाण आले आहे. `टाईम’ने असे लिहायला हवे होते की नाही, यावरून जो तो आपापल्या परीने काही मते मांडत सुटला आहे.

खरेच या सगळ्या गोष्टींची गरज आहे का? याचा विचार केला पाहिजे. भारतामध्ये अनेक वृत्तपत्रे निघतात. त्या वृत्तपत्रांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीविषयी, त्यांच्या यशाविषयी आणि अपयशाविषयी भारतातल्या या वृत्तपत्रांमध्ये भरपूर काही छापून येत असते.

बराक ओबामा यांची अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना भारतातल्या कितीतरी वृत्तपत्रांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि चरित्राचे भरपूर विश्‍लेषण केलेले होते. मग अमेरिकेतल्या एखाद्या वृत्तपत्राने भारताच्या पंतप्रधानांच्या यशापयशाची चर्चा केली, तर भारतामध्ये एवढी खळबळ माजण्याची गरज काय, असा एक मूलभूत प्रश्‍न मनात आल्याशिवाय रहात नाही. खळबळ माजली आहे हे मात्र सत्य आहे.

`टाईम’ साप्ताहिकाने आपल्या या विश्‍लेषणामध्ये मनमोहनसिंग यांना अपयशी पंतप्रधान ठरवले आहे. खरे म्हणजे यामध्ये नवीन काही नाही. मनमोहनसिंग हे अपयशी पंतप्रधान आहेत हे तर गेल्या तीन वर्षांपासून आपण पहातच आलो आहोत. मग तीच गोष्ट टाईमने म्हटली म्हणून आपण एवढी चर्चा करण्याची गरज काय?

कॉंग्रेसचे कार्यकर्ते या टीकेमुळे हवालदिल झाले आहेत. कारण ते मनमोहनसिंग यांच्या प्रतिमेला फार जपत असतात. मनमोहनसिंग यांना मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे असे कॉंग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. त्यातल्या त्यात ज्या मध्यम वर्गीयांना भाजपाचा आधार मानले जाते. त्या वर्गात मनमोहनसिंग फार लोकप्रिय आहेत असे त्यांना वाटते. हा वर्ग वृत्तपत्रात काय छापून येते यावरून आपले मत ठरवत असतो. या वर्गावर माध्यमाचा जास्त पगडा असतो.  त्यात काही विपरीत छापून आले की कॉंग्रेसचे नेते अहमहमिकेने त्या टीकेचा प्रतिवाद करायला लागतात. आताही टाइमने टीका करताच कॉंग्रेस पक्षाने त्या साप्ताहिकातली ही प्रसिद्धी त्वेषाने खोडून काढायला सुरूवात केली आहे.

खरे तर गेल्या तीन वर्षांपासूनची त्यांची कामगिरी वाईट आहे. कोणताही कॉंग्रेसवालाही हे मान्य करील. गेल्या काही वर्षांपासून विरोधी भाजपाचे नेते जे काही म्हणत आहेत तेच या साप्ताहिकानेही म्हटल्यामुळे भाजपाचे नेते खुष झाले आहेत. आपण जे काही म्हणत आहोत त्याला कोणी तरी दुजोरा दिला आहे असे म्हटल्यावर कोणालाही आनंद होतोच.  त्यांनी तसे म्हणायला सुरूवात करताच कॉंग्रेसच्या नेत्यांनीही बाह्या सरसावयाला सुरूवात केली आहे.

कॉंग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांनी या सार्‍या चर्चेवर बोलताना टाइम साप्ताहिकाला लक्ष्य न करता भाजपालाच टार्गेट केले. भाजपाच्या नेत्यांना आपला कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी शेवटी परदेशी साप्ताहिकाचा आधार घ्यावा लागला असा टोमणा सोनी यांनी लगावला आहे.  पण त्यांच्या या म्हणण्यात काही तथ्य नाही कारण परदेशी साप्ताहिकाने म्हटले काय की आणखी कोणी काही म्हटले काय, मनमोहन सिंग यांच्या धोरणांचे परिणाम काही वेगळे नाहीत. कोणीही विश्‍लेषण केले तरी वस्तुस्थिती काही बदलत नाही. अंबिका सोनी यांनी भाजपाला किंवा टाइम साप्ताहिकाला दोष देऊन काही उपयोग नाही. कारण टाइम आणि भाजपा नेते ज्या शब्दात मनमोहन सिंग यांचे विश्‍लेषण करीत आहेत त्याच शब्दात कॉंग्रेसच्या नेत्यांनीही मनमोहनसिंग यांच्या पदरात माप घातलेले आहे.

गेल्याच महिन्यात कॉंग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या अधिवेशनात कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केलेली होती आणि सरकारचे हेच धोरण कायम राहणार असेल, तर आपल्याला येत्या निवडणुकीला तोंड देणे मुष्कील होईल असे म्हटले होते. या घरच्या आहेराची मनमोहन सिंग यांनी दखल घेतली होती आणि आता आपण कंबर कसून कामाला लागणार आहोत असे म्हणून प्रलंबित विधेयके निकाली काढायला सुरूवात केली होती. या कामातले पहिले पेन्शन विधेयक चर्चेला समोर येताच  तृणमूल कॉंग्रेसने त्याला विरोध केला आणि सरकारचे कंबर कसून कामाला लागणे थांबले. 

हा सारा इतिहास काही फार जुना झालेला नाही. तेव्हा टाइममध्ये पंतप्रधानांवर टीका आली म्हणून अंबिका सोनी यांनी भाजपाच्या नावाने बोटे मोडण्यात काही अर्थ नाही. कारण टाइम आणि भाजपा नेते जे काही म्हणत आहेत तेच कॉंग्रेसचे नेतेही म्हणत आहेत. तेव्हा एका साप्ताहिकात काही विश्‍लेषण आले असेल तर त्यापासून धडा घेऊन मनमोहन सिंग यांना कामाला तरी लागावे लागेल किंवा त्यांना या पदावरून हटावे तरी लागेल.