आता केवळ एक एसएमएस करा आणि ब्रॉडबॅण्ड मिळवा

मुंबई, ७ जुलै-एमटीएनएलच्या ऑफिसमध्ये लॅण्डलाइन फोनचे बुकिंग करण्यासाठी सतराशे साठ चकरा मारणे, तासनतास रांगेत उभे राहणे, आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करणे या त्रासापासून आता ग्राहकांची सुटका होणार आहे. एमटीएनएलच्या नवीन योजनेनुसार, आता केवळ एका एसएमएसमार्फत लॅण्डलाइन किंवा ब्रॉडबॅण्ड कनेक्शनचे बुकिंग करता येणार आहे.

’एसएमएस करो, बुक करो’ ही नवी योजना महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने ग्राहकांसाठी आणली असून यामुळे ग्राहकांचा वेळ आणि दगदग दोन्ही वाचणार आहे. ग्राहकांनी आपल्या मोबाइलवर लॅण्डलाइनसाठी ’ङङ’ आणि ब्रॉडबॅण्ड कनेक्शनसाठी ’इइ’ टाइप करून आपली मागणी ९८६९८८९९८८ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस करून नोंदवायची आहे.

मागणी नोंदवली की एमटीएनएलचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन आवश्यक ती कागदपत्रे तसेच अर्ज गोळा करतील आणि त्यानंतर कमीत कमी कालावधीत ग्राहकांना लॅण्डलाइन किंवा ब्रॉडबॅण्ड कनेक्शनची जोडणी करून मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना १८००२२१५०० या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही आपली मागणी नोंदवता येणार आहे. ही योजना घरगुती फोन तसेच ऑफिसमधील लॅण्डलाइन अथवा ब्रॉडबॅण्ड कनेक्शनसाठीही लागू आहे.