बोल बच्चन

दिग्दर्शक रोहित शेट्टीने आतापर्यंत अजय देवगणच्याबरोबर गोलमालचे तीन भाग आणि `सिंघम’सारखा ऍक्शनचा धमाका असलेला सुपरहिट चित्रपट दिला आहे. सत्तरच्या दशकातला अमोल पालेकर यांचा `गोलमाल’ प्रेक्षकांना आजही ताजा वाटतो. याच गोलमालचा रिमेक रोहितने अजय आणि अभिषेक यांना घेऊन बनवला आहे. तो म्हणजे ‘बोल बच्चन’.

दिल्लीमध्ये राहणारा अब्बास अली ( अभिषेक बच्चन) बेरोजगार आहे. त्यातच त्याच्या घराचा ताबा त्याच्या काकाकडे न्यायालय देते, यामुळे तो बेघरही झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये तो दिल्लीपासून जवळच असलेल्या रणकपूरला त्याच्या वडिलांच्या मित्राकडे आपली बहीण सानियाला (असीन) घेऊन येतो. रणकपूरमध्ये आल्यानंतर एका मुलाला वाचविण्यासाठी तो पुरातन वादग्रस्त मंदिराचे कुलूप तोडतो. त्या प्रसंगानंतर पृथ्वीराज त्याला नाव विचारतो. काही अघटित घडू नये यासाठी तो अभिषेक बच्चन असे नाव सांगतो आणि मग खर्‍या अर्थाने ‘बोल बच्चन’गिरीला प्रारंभ होतो; आणि  प्रत्येक प्रसंगात नवीन पात्रांची एन्ट्री आणि धमाल सुरू होते.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये नाट्यमयता, खटकेबाज संवाद आणि हायपर अशी पात्रे असतात. ऍक्शनच्या जोडीला कॉमेडी अशा स्वरूपातच त्याच्या चित्रपटांची पटकथा असते हे आपण गोलमाल सीरिज आणि सिंघममध्ये पाहिले आहेच. त्याच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त हिरोच ऍक्शन करत नाही; तर गाड्याही हवेत उडतात.  तशाच गाड्या इथेही उडतात. त्याच्या पूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच यात हिंसक दृश्ये असली तरी कुठेही रक्ताचा थेंब सांडलेला दिसत नाही.

अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची कॉमेडी ऍण्ड ऍक्शन या दोन्ही प्रकारात केमेस्ट्री चांगलीच जुळलेली आहे, यामुळेच अजयची जादू रोहितच्या प्रत्येक चित्रपटात कायम असल्याचे दिसते. या चित्रपटातही अजय डार्क शेड्समध्ये आहे. मिशी आणि पिळदार शरीरयष्टी असलेला आणि तोडकी मोडकी इंग्रजी बोलणारा, असा हा पहेलवान अजयने रंगवला आहे. त्याच्या इंग्रजीमुळे प्रेक्षकांची चांगली हसवणूक होते. `गोलमाल ३’ आणि `सिंघम’च्या काही दृश्यांची आठवण अजयच्या भूमिकेमुळे होते.

अभिषेक बच्चनने अमोल पालेकरांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे; तर उत्पल दत्त यांच्या भूमिकेशी साधर्म्य साधणार्‍या भूमिकेत अजय देवगण दिसतो. अभिषेक दुहेरी भूमिकेत असला तरी दुसर्‍या पात्राच्या भूमिकेची लांबी जास्त नाही. चित्रपटाची कथा पूर्णपणे पृथ्वीराज आणि अब्बास यांच्या भोवती फिरणारी असल्याने इतर लोकांना फारसा वाव नाही. प्राची देसाई आणि असीनच्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या आहेत. अर्चना पुरणसिंग, कृष्णा अभिषेक, असराणी आपल्या भूमिकांमुळे लक्षात राहतात.

चित्रपटाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे ऍक्शन कॉमेडीने होते. अमोल पालेकरांच्या गोलमालची कथा जशीच्या तशी वापरलेली नसली, तरी प्रत्येक प्रसंगात त्याचा प्रभाव दिसतो. कथेला पटकथेची उत्तम जोड देतानाच त्यात हलक्या फुलक्या संवादाचाही योग्य वापर केला आहे. कॉमेडी आणि ऍक्शनचा सिक्वेन्स रोहितने ठराविक अंतराने ठेवला आहे, त्यामुळे प्रेक्षक कथेशी एकरूप होतो. मात्र, त्याचवेळी अजयची इंग्रजी काही वेळा नकोशी वाटते. चित्रपटाच्या कथेला साजेसे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. हिमेश रेशमियाचे संगीत असलेले ‘चलाओ ना नैनो के बाण रे..’ त्याच्या कमबॅकला नक्कीच उपयोगी पडेल, असे वाटते. रोहित-अजय-अभिषेकची केमेस्ट्री चांगली जमल्याने हलकाफुलका बोल बच्चन एकदा पहायला हरकत नाही.

Leave a Comment