मराठीत फार मोजक्या रहस्यमय भयपटांची निर्मिती झाली आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे कथानक, क्षणोक्षणी गडद होत जाणारे रहस्य, त्याला सफाईदार अभिनय- दिग्दर्शनाची जोड आणि थक्क करणार्या तांत्रिक कौशल्याची भक्कम तटबंदी असेल, तर निर्माण होणारी कलाकृती नक्कीच दर्जेदार होते.
भय, रहस्य, उत्कंठा यांचा खिळवून ठेवणारा अनुभव देणारा `ऐक’ हा नवा सस्पेन्स थ्रिलर आकारास आला आहे. येत्या १३ जुलैला हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. `ऐक’ ही कथा आहे एका रचलेल्या खेळाची, अकल्पित मानवी सावल्यांची… चित्रपटाचा नायक ऋषी, त्याची पत्नी आदिती आणि मुलगा विवान या त्रिकोणी कुटुंबाची… एका चॅनलसाठी काम करणारा ऋषी त्याचा बॉस सॅण्डीसोबत एक मराठी हॉरर शो तयार करण्याचे ठरवितो. स्पर्धकांसाठी रचलेल्या या खेळाचा डाव ऋषीच्या वैयक्तिक आयुष्यात थरार उडवून देतो. अमानवी सावल्यांचे भास, आभास, भीती, प्रेम, आक्रोश, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा भयपट म्हणजे आगामी `ऐक’ हा चित्रपट.
स्वप्नील जाधव, आदिती सारंगधर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, सुहास पळशीकर, शेखर फडके, भूषण घाडी, प्रशांत नेमण, ऋषिकेश गुजर, मौसमी हडकर, पूनम जाधव, शिल्पा कांबळे, बाल कलाकार स्वरांगी करंदीकर, तनीष सोनावणे या कलाकारांच्या भूमिका आहेत.