फुटबॉल चॅम्पियन टीमचे मायदेशात भव्य स्वागत

मॅद्रिद, दि.३ जुलै – यूरो चॅम्पियन स्पॅनिश फुटबॉल संघाचे आज मायदेशी पोहोचल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. देशात असलेल्या आर्थिक संकटाला विसरून लोकांनी जल्लोश केला. उघड्या डबल डेकर बसमध्ये संघाला बसविण्यात आले होते. रस्त्यांवर राष्ट्रध्वज घेऊन नाचत, गाणी म्हणत हजारोंच्या संख्येने फुटबॉलप्रेमी जमले होते. स्पॅनिश ध्वजाच्या लाल पिवळ्या रंगाचा जणू समुद्र रस्त्यावर आला असे वाटत होते. स्पेनने कीव येथे झालेल्या फायनलमध्ये इटलीला ४-० असे पराभूत करून अजिंक्यपद पटकावले.

समारंभाच्या शेवटी खेळाडू सेंट्रल प्लाजा दे सिबेलेस स्कवेयर येथे पोहोचले. तेथे लाउडस्पीकरवरून ’वी आर द चॅम्पियन्स’ वाजत होते. चौकात तयार करण्यात आलेल्या मंचावर रॉक बँडबरोबर खेळाडूदेखील नाचत गात होते. स्पेनचा गोलकीपर कर्णधार इकेर सेसिलास म्हणाला, एवढ्या महान खेळाडूंच्या संघाचा कर्णधार असणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. येथे येणार्‍या सर्व लोकांचे आभार.

Leave a Comment