वाजपेयींनी दिली होती एपीजे कलामांना मंत्रीपदाची ऑफर!

नवी दिल्ली, दि. ४ –  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९८ साली माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना एनडीए सरकारमध्ये मंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र कलामांनी वायपेयींची ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर २००२ साली कलाम राष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते. कलाम यांच्या आगामी  `टर्निंग पॉइंट: ए जर्नी थ्रू चॅलेंजेस ‘ या पुस्तकात हा खुलासा केला आहे.

`डीआरडीओचे प्रमुख असताना मला १५ मार्च १९९८ च्या मध्यरात्री वाजपेयींचा फोन आला. मी मंत्रिमंडळाची अंतिम यादी तयार करीत असून तुम्हाला कॅबिनेटमध्ये घेण्याचा विचार असल्याचे ते मला म्हणाले. मला विचार करायला थोडा वेळ द्या असे मी वायपेयींना सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता तुम्ही मला भेटा, असे वायपेयींनी मला सांगितले.’ असे कलाम यांनी या पुस्तकात लिहिले आहे.

त्या रात्री कलामांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना घरी बोलवून घेतले आणि मंत्रिमंडळात सामिल व्हायचे की नाही याविषयी पहाटेपर्यंत चर्चा केली. परंतु मी त्यावेळी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत होतो. ते प्रकल्प नुकतेच सुरु झाले होते. अशावेळी प्रकल्प अर्धवट सोडून जाऊ नये, असा सर्वसाधारण विचार मित्रांसोबत केलेल्या चर्चेतून पुढे आला होता, असे कलामांनी लिहिले आहे.

कलाम पुढे लिहितात,  `दुसर्‍या दिवशी सकाळी मी ७, सफदरजंग रोड येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेलो. मी आणि माझी टीम दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये व्यस्त असल्याचे त्यांना सांगितले. पहिला कार्यक्रम हा `अग्नी’ क्षेपणास्त्र विकासाचा होता, तर दुसरा कार्यक्रम हा अणू चाचणीच्या पूर्वतयारीचा होता. या दोन कार्यक्रमांमध्ये सामिल होऊन मी देशाची जास्त सेवा करू शकतो, असे मी त्यांना सांगितले. मला कृपया परवानगी द्या. वाजपेयींना ही गोष्ट पटली आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.