सौदी महिला खेळाडूंवर देशाची बंधने कायम राहणार

सौदीमधील महिला अॅथलिट यावर्षी प्रथमच लंडन ऑलिंपिक्स स्पर्धेत सहभागी होत असल्या तरी त्यांच्या देशाचे महिलांसाठी असलेले नियम पूर्णपणे पाळणे त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आले आहे. सौदीचे राजपुत्र नवाफ बीन फैजल यांनी यासंदर्भात एक आदेश जारी केला असून त्यानुसार सौदी महिला अॅथलेटसनी स्पर्धेत अंगभर पोशाख घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. महिलांसाठी असलेल्या शरिया नुसार म्हणजे धर्माने महिलांना ज्या परवानग्या दिल्या आहेत, त्यानुसार अंगभर पोशाख घालता येईल अशाच स्पर्धात त्यांनी सहभागी व्हायचे आहे. पुरुष खेळाडूंसोबत मिसळायचे नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या पालकांनीही हे नियम पाळले जातात यावर लक्ष ठेवायचे आहे.

आजपर्यंत सौदी, कतार आणि ब्रुनोई हे जगातील असे तीनच देश आहेत की या देशातील महिला खेळाडूंनी कधीही ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. सौदीतील महिला अॅथलेट लंडन ऑलिंपिक्सच्या निमित्ताने प्रथमच या स्पर्धात सहभागी होत आहेत तसेच कतारनेही त्यांची चार महिलांची टीम या स्पर्धेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबियात मैदानी खेळात महिलांचा सहभाग हा फार संवेदनशील विषय असून तेथे आजही महिला कार ड्रायव्हिंग करू शकत नाहीत. महिलांसाठी असलेल्या स्वतंत्र जिम बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या दुकानात पुरूष विक्रेते आहेत अशा दुकानातून महिला स्वतःची अंतर्वस्त्रेही घेऊ शकत नाहीत. त्यासाठी आता महिलांचीच दुकाने सुरू करण्याचा विचारही सौदी राजे करत आहेत असेही समजते.