किंग फिशरचे पायलट पुन्हा संपावर – चार उड्डाणे रद्द

मुंबई दि.२- गेले पाच महिने पगार न मिळाल्याने आणि त्यासंबंधी दिलेले आश्वासन न पाळल्याने किंगफिशरच्या पायलट्सनी पुन्हा संप पुकारला असून सोमवारी सकाळीच त्यांनी कामावर येण्यास नकार दिला. परिणामी मुंबईहून चेन्नई, मंगलोर, खजुराहोला जाणार्‍या चार फ्लाईटस रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारपासूनच किंगफिशरच्या कॅप्टनसह दोनशे पायलटसनी संप पुकारला आहे.

किंगफिशर समोरच्या अडचणी संपत नसल्याचेच सध्या तरी दिसत आहे. सध्या त्यांची फक्त १५ विमानेच कार्यरत असून १५ जमीनीवरच आहेत कारण विमाने उडविण्यासाठी पायलट नाहीत. भाडेपट्ट्यावर घेतलेली ३४ विमाने १ हजार कोटीचे भाडे थकल्याने परत करावी लागली आहेत. गेले पाच महिने पायलटसह बहुसंख्य कर्मचार्‍यांना पगार मिळालेला नाही. कंपनीचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी पगार देण्याचे आश्वासन दिल्याने पायलट कामावर हजर झाले होते मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. आज संपाची पुढील कृती ठरविण्यासाठी पायलट,इंजिनिअर्स, केबीन क्रू सह सर्व कर्मचार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

किंगफिशरला ऑईल कंपन्या, विमानतळांची देणीही भागवायची आहेत तसेच सरकारचा सेवा कर आणि टीडीएसही कंपनीने भरलेला नाही असे समजते.