‘मॅक्झीमम’वर्चस्वासाठीची लढाई

चित्रपट हे माध्यम समाजमनाचं प्रतिबिब असते अस म्हटल जात. मात्र आता अनेक असे चित्रपट येत आहेत, ज्यात ना मनोरंजन असते, ना काही वास्तव, ना काही संदेश. तो चित्रपट पहताना आपण एखाद्या घटनेविषयीचा किवा शहरासंबधीचा ड्रामा बघत आहोत. गँगस्टर विरूद्ध पोलिस अशा कथासूत्रवर असख्य चित्रपट आले आहेत. ‘मॅक्झीमम’ मात्र दोन पोलिस अधिकार्‍यांमधील वर्चस्वासाठीची स्पर्धा प्रेक्षकांसमोर मांडतो.

कबीर कौशिक दिग्दर्शित ‘मॅक्झीमम’ची कथा मुंबई शहराभोवती फिरते. दोन तोडीस तोड एन्काऊन्टर स्पेशालिस्ट आणि त्यांच्या आपसातल्या स्पर्धेमुळे इथल्या शहरावर, गुन्हेगारी विश्वावर, पोलिस यंत्रणेवर , राजकारणावर आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर उमटणारे पडसाद… कथासूत्र जितकं खणखणीत तितकीच उत्सुकता निर्माण करणारे कलाकार. एका बाजूला नसिरुद्दीन शहासारखा अभिनेता तर दुसरीकडे पोलिसी जरब निर्माण करणारा सोनू सूद. साडीतली लक्षवेधी नेहा धुपिया… असा सगळा सरंजाम पाहता ‘मॅक्झीमम’ च्या निमित्ताने जबरदस्त चित्रपट पाहायला मिळणार, अशा आशा पालवतात.

काहीतरी वेगळं, चटका लावणारं नाट्य पाहायला मिळेल, अशी सूक्ष्म आशा हा चित्रपट पाहण्याच्या आधी मनात असते. पण चित्रपट पुढे जातो तसतसा प्रेक्षकांच्या अपेक्षांचा फुगा स्वतःच हवा निघाल्यासारखा फुसफुसायला लागतो आणि शेवटाकडे तर तो पार फुटून जातो.

पोलिस अधिका-यांच्या भूमिकेत असलेले दोन नायकच  मोठे भाई आहेत. सोनू सुद आणि नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेल्या भूमिका बोअरिंग आहेत. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या या दोघांचीच एकमेकांशी स्पर्धा लागली आहे. हे दोघेच एकमेकांच्या खबर्‍यांचा जीव घेतात.

मुंबईच्या रस्त्यांवर उघडपणे लोकांचा खून करणे ही अंडरवर्ल्डसाठी अगदी साधी गोष्ट आहे. मात्र चित्रपटात ते कार्य पोलिस करतात. या चित्रपटात विनय पाठकने राजकारण्याची भूमिका साकारली आहे. पोलिस आणि पत्रकारांना कसे एकत्र बांधून ठेवता येईल हे त्याला चांगलेच कळते. मुंबईवर अंडरवर्ल्डपेक्षा पोलिसांचेच वर्चस्व असल्याचे दाखवण्यात आले आहे.

नसिरुद्दीन शहाचा अभिनय चांगलाच आहे. पण तेवढेच. नासीरबद्दलच्या अपेक्षा थिट्या पडतात. दुसरीकडे जबरदस्त व्यत्ति*मत्त्वाचा सोनू सूद. पोलिसी साच्यात  रुबाबदार दिसतो पण, प्रभावी ठरत नाही.  नेहा धुपिया साडीत चांगली दिसते. दिग्दर्शकाने कथेची मांडणी अतिशय ढिसाळपणे केली आहे. कथेतील उपकथानकाचा एकमेकांशी समन्वयच लावलेला नाही. काही प्रसंग ओढून ताणून जोडल्यासारखे वाटतात. चित्रपटातली बहुतांश दृश्ये क्लोजअपमध्ये टिपण्यात आली आहेत.

पोलिसांचे प्रोटोकॉल, त्याच्याशी जोडले गेलेले राजकीय हितसंबंध, मुंबईत रुतलेली गुन्हेगारी या सगळ्यांचे परदेशी गुन्हेगारीशी जुळलेले धागे, न्यूज चॅनलची भूमिका या गोष्टी अर्धवट वाटतात. किबहुना, या एकमेकात अडकलेल्या साखळ्या शेवटपर्यंत स्पष्ट होत नाहीत. चित्रपट उलगडत जाताना या गोष्टी प्रेक्षकांच्या मनात अलगद सुट्या व्हाव्यात, अशी अपेक्षा असते. पण त्याऐवजी गोंधळच वाट्याला येत राहतो आणि चित्रपट  संपल्यावर कंटाळलेल्या प्रेक्षकालाही हा गुंता सोडवावा, असं अजिबात वाटत नाही.  कबीर कौशिकचा हा मॅक्झिमम प्रयत्न प्रेक्षकांच्या मिनिमम अपेक्षा पूर्ण करण्यात  अपयशी ठरला आहे.

चित्रपट – मॅक्सिमम
निर्माता – कौंतेय फिल्मस
दिग्दर्शक – कबीर कौशिक
संगीत – अमजद नदीम, देवी श्री प्रसाद
कलाकार – सोनू सूद, नसीरुद्दीन शहा, नेहा धुपिया, विनय पाठक, आर्य बब्बर

– भूपाल पंडित

Leave a Comment