
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ म्हणून श्रेष्ठ आहेत. साधारणत: शास्त्रज्ञ हे समाजात मिसळत नाहीत. ते आपल्या संशोधन कार्यात मग्न असतात पण डॉ. कलाम यांना २००२ साली राष्ट्रपती करण्यात आले. तसे ते काही या पदाच्या रिंगणात वगैरे नव्हते. किंबहुना त्यांनी आपण राष्ट्रपती होऊ असा स्वप्नातही विचार केला नसेल. मुलायमसिंग यांनी त्यांचे नाव सुचविले आणि तेव्हा सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना एक शास्त्रज्ञ राष्ट्रपती होतोय ही कल्पना भावली म्हणून त्यांनीही हे नाव उचलून धरले. डॉ. कलाम हे मुस्लिम असल्यामुळे त्यांना राष्ट्रपती करून मुस्लिमांची सहानुभूती मिळवता येईल हीही भाजपाची कल्पना होतीच. एकुणात डॉ. कलाम अनपेक्षितपणे राष्ट्रपती झाले. कसे का असेनात पण राजकारणात पडले. खुर्ची ही एक अशी वस्तू आहे की ती जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तिच्याविषयी काही वाटत नाही पण एकदा मिळाली की मग ती सहजासहजी सोडावी वाटत नाही. तिची चटक लागते. त्यामुळेच असेल पण डॉ. कलाम २००७ साली पुन्हा राष्ट्रपती होण्यास उत्सुक होते. तेव्हा ते शक्य झाले नाही. आता आपण यापुढे जन्मात कधीच या पदाची लालसा बाळगता कामा नये असे त्यांनी ठरवायला हवे होते.
डॉ. कलाम यांनी २०१२ सालीही पुन्हा उत्सुकता दाखवली आणि निवड होण्याची शक्यता दिसत नाही असे दिसल्यावर आता या पदाचा नाद सोडला आहे. त्यांनी आपल्या त्या पाच वर्षांच्या कालावधीतील आठवणींवर ‘टर्निंग पॉइंट’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे. २००७ आणि २०१२ अशा दोन वेळा त्यांना या पदाने हुलकावणी दिली. या दोन्ही वेळा राष्ट्रपती कोण होणार, याचा निर्णय प्रामुख्याने सोनिया गांधी याच करणार होत्या. याचा सरळ अर्थ काढला गेला की, सोनिया गांधी डॉ. कलाम यांच्या नावाला कधीही दुजोरा द्यायच्या नाहीत. या दोघांच्या संबंधात काही तरी अशी ग्यानबाची मेख आहे की ज्यामुळे सोनिया गांधी डॉ. कलाम यांचे नाव समोर येताच त्यावर सरळ काट मारतात. चर्चा तरी अशीच होती.यामागचे कारण सर्वांना माहीत होते; पण ते कोणी प्रकटपणे सांगत नव्हते.
सोनिया गांधी २००४ साली पंतप्रधान होण्यास उत्सुक होत्या; पण तेव्हा राष्ट्रपती असलेल्या डॉ. कलाम यांनी त्यांना शपथ देण्यास नकार दिला, एका परदेशी व्यक्तीला शपथ देण्यापेक्षा आपण राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देऊ असे डॉ. कलाम यांनी त्यांना सुनावले आणि सोनिया गांधी यांना या पदाचा नाद सोडावा लागला, त्यांना मग अचानकपणे मनमोहनसिंग यांना पंतप्रधान करावे लागले. असे सांगितले जात होते. या संबंधात नेमके काय घडले हे केवळ तिघांनाच माहीत आहे. डॉ. कलाम, सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग. हे तिघेही काही बोलत नव्हते. आता डॉ. कलाम यांनी आपल्या या पुस्तकात याचा खुलासा केला आहे. आपण सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या आड आलो नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सोनिया गांधी या पंतप्रधान होऊ इच्छित होत्या तर त्यांना शपथ देणे हे आपले कर्तव्यच होते. घटनेतल्या तरतुदींनुसार आपण त्यांना शपथ देण्यास नकार देऊ शकत नव्हतो असे डॉ. कलाम यांनी म्हटले आहे. निदान आता तरी डॉ. कलाम यांनी दिलेली ही माहिती हा गौप्यस्फोट आहे कारण आजवर डॉ. कलाम यांनी सोनिया गांधी यांना शपथ देण्यास नकार दिला असेच मानले जात होते. याबाबत काहीही घडलेले असो पण आता ही माहिती समोर आल्यावर कॉंग्रेस नेत्यांनी आनंद व्यक्त करावा असे काय घडले आहे हे काही समजत नाही. सोनिया गांधी यांनी २००४ साली या पदाचा त्याग केला यामागे त्यांचा मोठा त्याग आहे अशी थिअरी कॉंग्रेस नेते मांडत असतात. पण बाकीचे लोक या कथित त्यागाचा अन्वयार्थ लावताना, सोनिया गांधी यांनी त्याग वगैरे काही केलेला नसल्याचे म्हणतात. डॉ. कलाम यांनी धुडकावल्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले आहे, पण त्यांनी हा अपमान झाकून हे त्यागाचे नाटक केले आहे असे सोनिया गांधी यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. आता त्यांना डॉ. कलाम यांनी धुडकावले नसल्याचे उघड झाले आहे. म्हणून आता कॉंग्रेसचे नेते सोनिया गांधी यांचा तो खरा त्यागच होता असे ठासून सांगत आहेत. पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे. सोनिया गांधी यांनी त्यागाच्या भावनेतून ही संधी सोडली नसून न्यूनगंडापोटी सोडली आहे. आपल्यात पंतप्रधानपद सांभाळण्याची कुवत नाही हे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी हे पद मनमोहनसिंग यांना दिले आणि या पदापेक्षाही मोठे पण प्रशासनाची जबाबदारी नसलेले आघाडीचे अध्यक्षपद मिळवले. त्यांच्या त्या कथित त्यागाचा बुरखा फाडणार्या अनेक घटना नंतर घडल्या आहेत. त्यांनी अधिकाराचे पद मिळवून आपल्याला पदाची लालसा असल्याचे दाखवून दिले आहेच; पण गेल्या अनेक वर्षात कधीही एखाद्या पत्रकार परिषदेला तोंड दिलेले नाही आणि उत्स्फूर्तपणाने दोन मिनिटांचेही भाषण केलेले नाही यातूनच त्यांची कुवत दिसून आली आहे. डॉ. कलाम यांच्या गौप्यस्फोटाचा वापर करून कॉंग्रेसवाल्यांनी नाचण्याचे कारण नाही. सोनिया गांधी यांच्या त्यागाचा बुरखा या गौप्यस्फोटाच्या आधी आपोआपच फाटलेला आहे.