पणजी, दि. २७ – व्यावसायिक परिषदांच्या नावाखाली गोव्यात पांढरपेशी वेशाव्यवसाय वाढीस लागला आहे. विविध कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांसाठी अशा परिषदांचे आयोजन करणार्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांची शारीरिक भूक भागविण्यासाठी मुली पुरविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गोवा सरकारचे महिला आणि बाल कल्याण खाते व ‘अन्याय रहित जिंदगी’ या महिलांच्या लैगिंक शोषणाविरूद्ध आवाज उठविणार्या व त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका परिषदेत मंगळवारी अनेक वक्यांनी या विषयावर प्रकाश टाकला.
व्यावसायिक परिषदांच्या नावाखाली गोव्यात व अन्य राज्यांमध्ये तरूणी व महिलांचे होणार्या लैंगिण शोषण कसे रोखता येईल, हा या दोन दिवसीय परिषदेच्या मुख्य उद्देश आहे.
गोवा पोलिसांनी अलिकडेच अंजुणे येथे अशाच एका परिषदेवर छापा टाकला असता, आंध्र प्रदेशातील एका खत उत्पादन कंपनीच्या ग्राहकांसाठी त्या राज्यातून आणलेल्या अनेक मुलींना ताब्यात घेण्यात आले. या मुली प्रामुख्याने आंध्र प्रदेशच्या चित्रपट सृष्टीशी संबंधित होत्या. खत कंपनीच्या वितरकांना खूष करण्यासाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने त्यांना गोव्यात आणले होते. येथे आल्यानंतर त्यांना काय करावे लागणार याचीही स्पष्ट कल्पना या युवतींना होती. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या मुलींची सुटका झाली. पोलिस निरीक्षक गुरूदास कदम यांनी हा छापा टाकला होता व त्यांनीच परिषदेत ही गोष्ट उघड केली.
गोवा महिला आणि बाल कल्याण खात्याचे संचालक संजीव गडकर यांच्या प्रयत्नातून आजच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यात वेश्या व्यवसायासाठी ज्या राज्यातील मुलींचा अधिक सहभाग आढळून आला आहे त्यात प्रामुख्याने आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड, मिझोराम, मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. तेथील प्रतिनिधींना या परिषदेसाठी खास पाचारण करण्यात आले.