पुणे-कोचीन विमानसेवा लवकरच

पुणे, दि. २५ – दक्षिण भारतातील कोचीन येथे विमानाने जायचे असल्यास आधी मुंबई नंतर कोचीन असा प्रवास करावा लागत असे. आता मुंबईला जाण्याचा वेळ आणि त्रास कमी होणार आहे. येत्या एक महिन्याभरात पुणे-कोचीन या रूटवर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती विमानतळ ऍथॉरिटीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सध्या पुण्याहून बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद या मार्गांवर विमानसेवा सुरू आहे. पुण्याहून कोचीनसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. देशांतर्गत विमानसेवा चालवणार्‍या इंडिगो कंपनीने या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी अर्ज सादर केला असून, लवकरच ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.