पाठ्यपुस्तकांच्या छपाईत पुन्हा घोडचुका डॉ. आंबेडकर, नेहरूंचे छायाचित्र उलटे

पुणे, दि. २५ – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे शालेय पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. मात्र, दरवेळेस चुका केल्या जातात. हाच कित्ता या वर्षीही गिरवण्यात आला आहे. इयत्ता पाचवीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात ३० ते ३५ पाने चुकीची छापली आहेत. त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्‍वर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची छायाचित्रे उलटी छापण्यात आली आहेत.

इयत्ता पाचवीचा अभ्यासक्रम बदलेला नाही. तथापि, या पुस्तकांचे पुनर्मुद्रण करताना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने या घोडचुका केल्या आहेत. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे इयत्ता पहिली ते बारावीसाठी १९ कोटी पुस्तके आठ भाषांमध्ये छापली जातात. त्यासाठी ४० ते ५० कोटी रुपये खर्च येतो. त्यापैकी इयत्ता पाचवीच्या वर्गाची १४ लाख ७० हजार पुस्तके छापण्यात आली असून त्यासाठी २० ते २२ लाख रुपये खर्च आला आहे, अशी माहिती बालभारतीचे व्यवस्थापक ए. डी. गायकवाड, यांनी दिली.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच साधारणत: पाच ते सहा महिने आधीच पुस्तकांच्या छपाईचे काम सुरू होते. बाईंडिंगला देण्यापूर्वी तपासणीही केली जाते. मात्र, शंभर टक्के सर्व तपासणी होईलच असे नाही. अडीचशे कर्मचारी यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. राज्यभरातील पुस्तकांचे काम आमच्याकडे असते. त्यामुळे पुस्तकांच्या बांधणीमध्ये एखादी चूक होऊ शकते. जाणीवूपर्वक अशी कोणतीही चूक झालेली नाही, असेही गायकवाड म्हणाले.