ब्रिटनच्या राणीचा तनखा वाढला

सिंहासनावर आरूढ होऊन साठ वर्षे उलटल्याचा हिरक महोत्सव साजरा करणार्‍या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथसाठी आणखीही एक खुशीची खबर असून तिचा तनखा तब्बल २० टक्कयांनी वाढविला गेला आहे. यंदा राणीला वर्षाला ३६ दशलक्ष पौंड इतका तनखा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे मंदीच्या झळा अनुभवत असलेल्या ब्रिटनमध्ये ब्रिटनवासिय महागाई, करआकारणी, बेकारी यांना तोंड देत असताना राणीचा तनखा मात्र वाढविण्यात आला आहे.

राणीची मालमत्ता असलेल्या क्राऊन इस्टेट आणि रिजंट स्ट्रीट, सेंट जेम्स डीसट्रिक्ट लंडन येथून राणीला मार्च २०१२ पर्यंत २४०.२ दशलक्ष पौंडांचा फायदा झाला असून ही वाढ चार टक्के इतकी आहे. या भागात असलेल्या इमारतीतील दुकानांना भाडे तत्वावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व त्यामुळेच या इस्टेटीच्या नफ्यात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

राणीचा तनखा २०१० साली ३० दशलक्ष पौंडावरच गोठविण्यात आला होता.राणीला दिला जाणारा तनखा करदाते तसेच अन्य सरकारी अनुदानातून दिला जातो. किंग जॉर्ज तिसरा याने त्याची सर्व मिळकत १७६० मध्येच ट्रेझरीत जमा केली होती. क्राऊन इस्टेटीतील नफा आजही ट्रेझरीतच जमा केला जातो. २०१३-१४ साली येणार्‍या नवीन कायद्याप्रमाणे या इस्टेटीतून जो नफा मिळेल त्याच्या १५ टक्के रक्कम राणीला दिली जाणार आहे. म्हणजेच ब्रिटनच्या आर्थिक स्थितीनुसार यापुढे राणीचा तनखा कमी जास्त होणार आहे. या तनख्यातून प्रामुख्याने राजवाड्यातील नोकरांचे पगार, धुलाई बिले, स्टेशनरी, अधिकृत समारंभ असा खर्च केला जातो. राणीचा तनखा आता २००८ पासून प्रथमच इतका झाला असला तरी तिला १९९१ साली मिळत असलेल्या ७७.३ दशलक्ष पौंडांपेक्षा तो कमीच आहे.