या देशात सेक्युलॅरिझमची व्याख्या नेमकेपणाने करण्यात आलेली नाही. सेक्युलॅरिझम ही एक टोपी आहे, ती टोपी जो आपल्या डोक्यावर घालतो तो ती आपल्या डोक्यावर फिट बसते, असा दावा करतो. म्हणजे आपल्या देशातल्या अनेक संघटना आणि राजकीय पक्ष आधी स्वत:ला सेक्युलर म्हणवतात आणि आपण धर्माच्या संबंधात जो आणि जसा व्यवहार करतो तो व्यवहार म्हणजे सेक्युलॅरिझम असा दावा करतात. एका बाजूला सेक्युलॅरिझमची अशी ओढाताण सुरू असते, तर दुसर्या बाजूला हिंदू आणि हिंदुत्व यांच्या बाबतीतही असाच प्रकार सुरू असतो. मुळात हिंदू हा काही धर्म नाही, ती एक जीवन प्रणाली आहे असे म्हटले जाते. देशात काही संघटना आणि पक्ष हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. त्यांचा आधार हिंदुत्व हा असतो. हिंदुत्व हा धर्म नसून जीवन प्रणाली आहे असे कितीही म्हटले जात असले, तरीही या जातीयवादी संघटनांना हिंदुत्वात अभिप्रेत असलेला धर्म हिंदू धर्मच असतो. त्यामुळे त्या संघटना सेक्युलर ठरत नाहीत. म्हणून सेक्युलर पक्ष त्यांच्यापासून दूर राहतात. पण ही हिंदुत्ववादी मंडळी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आपणच खरे सेक्युलर आहोत असाही दावा करायला कचरत नाहीत.
आता जनता दल (यू) चे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशाचा भावी पंतप्रधान सेक्युलर असला पाहिजे असे म्हटले आहे. त्यामुळे हिंदू, हिंदुत्व आणि सेक्युलॅरिझम यांच्या संबंधाने नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान सेक्युलर असावा असे म्हणताना नितीशकुमार यांना, तो नरेन्द्र मोदी यांच्या सारखा नसावा असे सुचवायचे आहे. यातून त्यांनी भारताच्या भावी पंतप्रधानांवर चर्चा सुरू करून दिली आहे.
खरे तर २०१४ सालची निवडणूक लांब आहे. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. भाजपाला आणि त्यांच्या मित्रपक्षांनाही बहुमत मिळण्याची शक्यताही तेवढीच कमी आहे. पण भाजपा प्रणित रालोआघाडीच्या हातात नक्कीच सत्ता येणार आहे असे समजून, बाजारात तुरी…. या न्यायाने पंतप्रधान कोण असावा, यावर भांडण सुरू झाले आहे. गेले वर्षभर अशा प्रकारचा संघर्ष भाजपामध्ये सुरू होता. तो काही दिवस सूप्तपणे चालला आणि मुंबईच्या अधिवेशनात उघड्यावर आला. त्यातून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मोदी यांचा घोडा वेगाने पळत असल्याचे आणि अडवाणी यांचा थकलेला घोडा मागे पडत असल्याचे उघड झाले. भाजपाच्या नेतेपदाच्या शर्यतीत कोणाचाही घोडा केवळ तरुण आहे म्हणून भरधाव पळत नसतो. त्याला संघाच्या पाठींब्याचा चंदीचारा मिळावा लागतो. तो मोदी यांना मिळाला आहे हे खरे पण तेवढ्यावरही मोदींचा घोडा पळू शकत नाही. कारण अजून तरी १०० टक्के भाजपाचे सरकार सत्तेवर येईल एवढी ताकद भाजपाने कमावलेली नाही. तेव्हा घटक पक्ष काय म्हणतात यालाही महत्त्व आहे.
शिवसेना आणि अकाली दल या भाजपाच्या मित्र पक्षांनी यावर फारशी चर्चा केली नाही. जनता दल(यू)ने मात्र प्रथमच आपले मत मांडले आणि रालोआघाडीचा पंतप्रधान सेक्युलर असावा असे म्हणून आपला पक्ष मोदी यांना समर्थन देणार नाही असे स्पष्टच केले. संघाच्या नेत्यांना हे पटणार नाही कारण ते कट्टर हिंदुत्ववादी मोदींना पंतप्रधान करण्यास आतुर झाले आहेत. नितीशकुमार यांनी आपले मत मांडताच सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी त्यावर टिप्पणी केली. संघ ही केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करणारी संघटना आहे, असे आवर्जुन सांगणार्या संघाला असा अधुनमधून आपल्या सांस्कृतिक वशाचा विसर पडतो आणि राजकीय उबळ येते. तेव्हा भागवत यांनी आपले खरे मत व्यक्त केलेच. ते करताना त्यांनी नितीशकुमार यांना डिवचले. नितीशकुमार हे स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यास लाजतात असा भागवत यांनी आरोप केला. हा संघाचा एक पवित्रा असतो. खरे तर जे स्वत:ला हिदुत्ववादी म्हणवून घेत नाहीत असे अनेक हिंदू आहेत. ते हिंदू हिंदू म्हणवून घेण्यास कधीच लाजत नाहीत. हिंदू असणे आणि हिंदुत्ववादी असणे यात फरक आहे. संघाचा मात्र सगळ्या हिंदूंनी हिंदुत्ववादी असावे असा आग्रह असतो.
नितीशकुमार यांनी आपल्या मोदी विरोधी पवित्र्याने पंतप्रधानपदाच्या निवडणुकीची रंगत वाढवली आहे. या सार्या राजकारणात नितीशकुमार यांना नेमके काय म्हणायचे आहे हे कळत नाही. ते मोदी यांना सेक्युलर मानत नाहीत पण मोदी ज्या भारतीय जनता पार्टीचे आहेत त्या पार्टीला मात्र सेक्युलर मानतात. त्यांचीही सेक्युलॅरिझमची कल्पना आपल्या सोयीनुसार बदलत असते. केवळ नितीशकुमारच नव्हे तर भाजपाच्या वळचणीला राहून केन्द्रात सत्तेचे लाभ घेणार्या सर्व सेक्युलर पक्षांना सत्ता समोर दिसायला लागली की भाजपा सेक्युलर वाटायला लागतो. १९९८ साली त्यांनी वाजपेयी यांना सेक्युलर मानले होते. त्या काळात त्यांना अडवाणी कट्टर हिंदुत्ववादी वाटत होते. संघालाही अडवाणी वाजपेयीपेक्षा अधिक कट्टर वाटत होते. पण आता अडवाणी सौम्य आणि मोदी कट्टर ठरले आहेत. नितीशकुमारही आता अडवाणी यांना सेक्युलर मानायला तयार आहेत म्हणून ते मोदींना विरोध करून अप्रत्यक्षपणे अडवाणी यांच्या उमेदवारीचे समर्थन करीत आहेत.