एका सोनोग्राफी केंद्रासह ५० गर्भपात केंद्रे बंद

ठाणे, दि. १८- ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ६३ सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्यात आली असून, एक सोनोग्राफी केंद्र बंद करण्यात आले आहे. तसेच ५० गर्भपात केद्रांमध्ये काही त्रुटी आढळल्याने ही केंद्रे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. बी. कुलकर्णी यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सुरु असलेल्या वैद्यकीय गर्भपात आणि वैद्यकीय तपासणी मोहिमेत १५ जूनपर्यंत ६३ सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील वैद्यकीय गर्भपात आणि सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी ४ जून रोजी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले. त्यानुसार १ जूनपासून वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि महसुल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही तपासणी करण्यात येत असून त्यासाठी १६ पथके तयार करण्यात आली आहेत. यानंतर काही केंद्रांवर कारवाई; तर एका सोनाग्राफी केंद्रास सील ठोकण्यात आले.