पोलिओ लसीकरणावर पाकिस्तानात तालिबान्यांची बंदी

इस्लामाबाद दि.१८- जोपर्यंत अमेरिकेकडून होत असलेले ड्रोन हल्ले बंद होत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानात सरकारचा पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम करता येणार नाही असे तेथील तालिबानी कमांडर हफीज गुल बहादूर यांने जाहीर केले असून तशा आशयाची पत्रकेही त्या भागात वितरीत करण्यात आली आहेत.

आदिवासी बहुल असलेल्या या भागात पोलिओचा प्रसार अधिक असून यंदाच्या वर्षात १८ पोलिओचे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारने या भागात पोलिस प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविला आहे. मात्र पाकिस्तानमधील सरकारी सर्जन शकील अफ्रिदी याने याच भागात ओसामा बिन लादेनच्या शोधासाठी अमेरिकेला मदत करण्याच्या हेतूने पोलिओ लसीकरणाचाच बनाव केला होता व आता देशद्रोहाच्या आरोपाखाली या डॉक्टरला ३३ वर्षांचा तुरूंगवास सुनावण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच तालिबानी नेत्यांनी या भागात पोलिओ लसीकरण करता येणार नाही असा फतवा जारी केला आहे.

मीरनशाह या मुख्य शहरात वाटण्यात आलेल्या या उर्दू पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे येथे जितके निरपराध नागरिक मारले जात आहेत आणि या भागाचे नुकसान होत आहे तितके पोलिओमुळे झालेले नाही. पोलिओमुळे हजारात एखाद्याला नुकसान होत असेल तर ड्रोन हल्ल्यांमुळे शेकडो महिला, बालके आणि वृद्ध मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे अमेरिका जोपर्यंत ड्रोन हल्ले थांबवित नाही तोपर्यंत येथे पोलिओ लसीकरण होणार नाही. जे कॉन्ट्रक्टर आणि स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते लसीकरणासाठी या भागात येतील, त्यांच्यावर तालिबान हल्ले करेल आणि या हल्याची जबाबदारी संबंधितांवर राहील असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तालिबानच्या फतव्याविरोधात आम्ही जाऊ शकत नाही असे येथील आदिवासी जनतेचे म्हणणे आहे.