मराठी चित्रपटांच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव

पुणे, दि. १७ – मराठी चित्रपटांना मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाकडून देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे पुढील काळात मराठी चित्रपटांना ४० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.

मराठी चित्रपटांना अनुदान किती मिळावे? या संदर्भात नुकतीच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाची बैठक झाली. यामध्ये सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, संचालक घोरपडे, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, विकास पाटील यांच्यासह ६० जण उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांना सांस्कृतिक मंडळाकडून अनुदान मिळत आहे. निर्मात्याच्या दुसर्‍या चित्रपटांपासून तीन वर्षांच्या फरकाने प्रत्येकी तीन चित्रपटांसाठी एका निर्मात्याला `अ’ आणि `ब’ दर्जानुसार प्रत्येकी पंचवीस व तीस लाख रुपयाचे अनुदान मिळत आहे. आता नवीन धोरणानुसार एका चित्रपट निर्मात्याला पहिल्या चित्रपटापासून सलग पाच चित्रपटांसाठी दोन वर्षाच्या फरकाने ४० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या संदर्भात नुकतीच सांस्कृतिक मंडळाची बैठक झाली असून, या बैठकीत अनुदान वाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच हा प्रस्ताव येत्या सहा महिन्यात मान्य करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.