राज्यात मान्सून सक्रीय

पुणे, दि. १७ – गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक व दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर व  सातार्‍यात स्थिरावलेला मान्सून अखेर आज सक्रीय झाला. त्याने संपूर्ण कोकण, पुणे-मुंबईसह मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा बहुतांश भाग व संपूर्ण मराठवाडा तसेच गुजरात, छत्तीसगड, ओरिसा पश्‍चिम बंगालचा काही भाग व्यापला असून येत्या  २४  तासात मान्सून  महाराष्ट्राचा संपूर्ण भाग व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

दरवर्षी १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार्‍या मान्सूनला केरळमध्ये येण्यास यंदा पाच दिवस उशीर झाला. मात्र केरळमध्ये ५ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने एकाच दिवासात आंध्र  प्रदेश, कर्नाटक  व महाराष्ट्रात कोल्हापूर व सातार्‍यातील काही भागात व्यापला होता. मात्र गेल्या १० ते १२ दिवसांपासून तो दक्षिण मध्य महाराष्ट्रातच स्थिरावला  होता. मान्सून राज्यातील इतर जिल्ह्यात सरकण्यास अनुकूल परिस्थिती असून  लवकरच  तो  राज्यात सक्रीय होईल, असा अंदाज दोन दिवसांपूर्वी वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आज मान्सून  राज्यात रत्नागिरी, सिंधुदूर्ग सह मध्यमहाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, अकोला, अमरावती , नांदेड आदी जिल्ह्यात दाखल झाला.