‘जय महाराष्ट्र, ढाबा भटिंडा’ ऑगस्टमध्ये

सरसों के खेत, पंजाबी पगड्या, सलवार कमिज आणि अशा सगळ्या वातावरणात एक रोमँटिक कपल… शाहरूख आणि काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आठवला ना? पण ही दृश्ये आहेत, चक्क एका मराठी चित्रपटातली. अवधूत गुप्ते यांचा पंजाबमध्ये चित्रित झालेला ‘जयमहाराष्ट्र ढाबा भटिंडा‘ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

मुंबई मिनी पंजाब, दि दरबार, कॅफे मद्रास, बगदादी, उडिपी विहार, कॅफे राजस्थान, केरला हाउस अशा अनेक पार्ट्या मुंबईत, महाराष्ट्रात मराठी भाषेत दिसतात. पण महाराष्ट्राबाहेर विशेषत: पंजाबमध्ये एकतरी मराठी पार्टी असेल का? गुप्तेंच्या `जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ चित्रपटात ही पार्टी पाहायला मिळते. तसे तर पंजाबी लोक पट्टीचे खवय्ये. असल्याचे म्हटले जाते. पंजाबी लोकांनी जगाला चवीचे खायला शिकवले. चिकन टिक्का, तंदुरी चिकन या जागाच्या कानाकोप-यात पोहोचलेल्या पंजाबी डिशेस आणि सर्वत्र दिसणारे पंजाबी धाटणीचे ढाबे हे याचेच पुरावे.

पंजाबच्या भटिंडा शहरात सयाजी निंबाळकर नावाचा एक मराठी युवक आपला ढाबा थाटतो आणि तिथल्या सरसोंच्या शेतात त्याची प्रेमकहाणीही फुलते. अशी या चित्रपटाची वन लाइन स्टोरी आहे. ही टीपकल लव्ह स्टोरी पंजाबच्या पार्श्‍वभूमीवर चित्रित झाल्यामुळे डीडीएलजेची प्रकर्षाने आठवण करून देते. काही पंजाबी लोक जेवणाआधी वदनी कवळ घेता.. म्हणतानाचेही दृश्यही या चित्रपटात आहे. चित्रपटाला नेहमीचा कॉमेडी तडकाही असणार हे नक्की. चित्रपटात अभिजीत खांडकेकर हा नायकाच्या भूमिकेत आहे. तर नायिकेविषयी सध्या गोपनीयता बाळगण्यात आली आहे. ती चित्रपटाची प्रमोशन ट्रीक असल्याचे सांगण्यात येते. येत्या ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.