राष्ट्रपती निवडणूक लढविणारच-पी.ए.संगमा

नवी दिल्ली दि.१५- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सर्वसंमतीने ठरविलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारास राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देईल असे जाहीर केले असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी लोकसभा सभापती पी.ए.संगमा यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्याबाबत ठाम असल्याचे एका वृत्तवाहिनीला नुकतेच सांगितले आहे.

संगमा यावेळी बोलताना म्हणाले की ए.पी.जे.अब्दुल कलाम हे जरी राष्ट्रपती पदाचे उमेदवार ठरले तरी मी निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली मते आपल्याकडे आहेत असाही दावा त्यांनी केला आहे. अनुसुचित जमातीला यंदा राष्ट्रपती पदाचा मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करणार्‍या संगमा यांनी पूर्वीपासूनच आपणही उमेदवार असू शकतो असे स्पष्ट केले होते.

दरम्यान ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सध्यातरी याबाबत मौन बाळगणेच पसंत केले असून योग्य वेळ येताच निर्णय घेईन असे सांगितले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी आज कलाम यांना भोजनासाठी आमंत्रण दिले असून कलाम सध्या पाटण्यातच आहेत. दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक सुरू झाली असून काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केल्यानंतरच आघाडी त्यांच्या उमेदवारासंबंधी घोषणा करणार आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment