टाटा मेमोरीयल सेंटरच्या कँन्सर इस्पितळासाठी हाफकिन संस्थेची ५ एकर जमीन देणार

मुंबई, दि. १२ -मुंबईतील टाटा मेमारियल सेंटरला महिला व बालकांसाठी कँन्सर रूग्णालय व हॅड्रोन बिम थेरपी केंद्र स्थापन करण्यासाठी हाफकिन संस्थेची पाच एकर जमीन ३० वर्षांसाठी नाममात्र किंमतीस व दर ३० वर्षांनी नुतनीकरण करण्याच्या  अटीवर देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

केंद्र शासनाच्या अणू उर्जा विभागाच्या नियंत्रणाखालील टाटा मेमोरीयल सेंटर हे परळ येथे ४ एकर जागेवर आहे. दिवसेंदिवस कँन्सर पिडीत रूग्णांची संख्या वाढत असून दरवर्षी ३ लाख कँन्सर पिडीतांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत सुविधांची गरज भासत आहे.  सध्या या रूग्णालयात अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने ४५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून त्यातून कॅन्सरग्रस्त मुले आणि महिला यांच्यावरील उपचारासाठी एक अत्याधुनिक हॅड्रोन बिम थेरपी यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी टाटा मेमोरियल सेंटरला जागेची आवश्यकता आहे.