
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलधाडीविरोधात आंदोलन करण्याचे सुतोवाच करताच राज्यातील अनेक टोल नाक्यांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आज मनसे कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील टोलनाका फोडला. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही आंदोलन करुन वसईच्या टोलनाक्यावर तोडफोड केली. त्यानंतर दुपारी वाशीच्या टोल नाक्यावरही आंदोलन केले. याशिवाय नाशिक-निफाड महामार्गावरही आंदोलन सुरु करण्यात आले. ओंढा येथील टोलनाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. सुमारे १०० कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक केली. तर दुपारी औरंगाबादजवळ हरसुल येथील टोल नाक्यावरही सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन टोल वसूली थांबविली. नाक्याची तोडफोडही केली.
