आमचा देश नेत्याशिवायच चालतोय-अझीम प्रेमजी

बंगलोर दि.१३ – जागतिक बँकेने भारताचा विकास दर २०१२-१३ सालासाठी ६.९ टक्के इतकाच राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर उद्योगवर्तुळातून त्याबाबत तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. इंडिया इंकचे नेते आणि विप्रो या बलाढ्य कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी आमचा देश नेत्याशिवायच वाटचाल करतो आहे. देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्याला काळजी वाटते असे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर आम्ही आत्ताच बदललो नाही तर वर्षानुवर्षे आम्ही गाळातच जाऊ असेही ते म्हणाले. जागतिक बँकेने भारताचा विकास दर ६.९ वर येईल असे म्हटले आहे याचाच दुसरा अर्थ असा की देशाची आर्थिक धोरणे, सुधारणा ठप्प होणार आहेत. विजेची कमतरता कायम राहणार आहे आणि महागाई अशीच वाढत राहणार आहे असेही प्रेमजी म्हणाले.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही जागतिक बँकेने जाहीर केलेला विकास दर ऐकून वाईट वाटल्याचे सांगितले आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी जे आवश्यक आहेत ते सर्व उपाय योजले जातील अशी अपेक्षा होती आणि तसा विश्वासही होता असे सांगून ते म्हणाले की जागतिक बँकेचे अंदाज निराशाजनक आहेत. १९९१ सालच्या भारताच्या आर्थिक सुधारणांचा चेहरा असलेले मनमोहनसिंग हेच पंतप्रधान पदी असल्याने आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्यांच्याबद्दल विश्वासही होता त्याला तडा गेला आहे. आर्थिक वाढ कमी याचाच अर्थ आर्थिक तूटीत वाढ,महागाईत वाढ, पायाभूत सुविधा ठप्प आणि गुंतवणुकीवर वाईट परिणाम असेही ते म्हणाले.