कातिल सिद्दीकीच्या खुन्यांना २५जून पर्यंत पोलीस कोठडी

पुणे, दि. १२ –  ˆकुख्यात दहशतवादी महम्मद कातिल सिद्दिकी खूनप्रकरणी गुंड अशोक मोहोळ आणि अलोक भालेराव या दोघांनाही  आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. न्यायमुर्ती एस.एस.पाटील यांच्या न्यायालयात त्यांना सादर करण्यात आले होते.

कुख्यात गुंड आणि कैदी असलेले मोहोळ आणि भालेराव यांच्यावर अपहरण, खंडणी यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशा वेळी जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी मोहम्मद सिद्दिकी यांचा खून का करण्यात आला? यामागे कोणाचा कट आहे? कोणी सुपारी देऊन तर हे काम करून घेतले आहे का? अशा अनेक बाजूंचा तपास करण्यासाठी येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर जाधव यांनी आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आरोपींना २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी ऍड.एन.डी.पवार यांनी आरोपीचे वकील म्हणून तर ऍड.एम.जी.पौळ यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

दरम्यान, मोहोळ आणि भालेराव हे संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का)  येरवडा तुरुंगात आहेत. अपहरण आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. सिद्दिकीचा शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडासेलमध्ये नाडीने गळा आवळून खून झाल्याचे उघड झाले होते. हा खून मोहोळ आणि भालेरावनेच केला असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना येरवडा पोलिस निरीक्षक किशोर जाधव यांच्या पथकाने त्यांना येरवडा तुरुंगातून ताब्यात घेऊन अटक केली. या खुनाचा उद्देश काय होता, ज्या नाडीने त्यांनी सिद्दिकीचा गळा आवळून खून केला तिचा शोध घेण्यासाठी मोहोळ आणि भालेरावकडे तपास करायचा असल्याचे जाधव यांनी नमूद केले. दरम्यान, मोहोळ आणि भालेराव यांनी ती नाडी जाळून स्वच्छतागृहात टाकून दिल्याचे समजते.