विद्यार्थ्यांना मिळणार यूआयडी क्रमांक/आधार कार्ड

पुणे दि.१२- राज्य शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी बनावट पटसंख्या दाखविण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या बोगस विद्यार्थीसंख्येला आळा बसावा आणि खर्‍या विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण दिले जावे तसेच शाळांकडेही विद्यार्थ्यांची सर्व माहिती असावी यासाठी विद्यार्थ्यांनाही यूआयडी क्रमांक देण्यात येणार असल्याचे समजते. यासंबंधीची कार्यशाळा पुण्यात नुकतीच पार पडली.

शालेय शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना केंद्रभागी ठेवून आखलेली असावी या उद्देशाने शालेय शिक्षणात शिक्षण हक्क अधिनियम २००९ प्रमाणे आमुलाग्र बदल केले जात आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन करण्यासाठी सर्वंकष मूल्यमापन पुस्तिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशा प्रकारची ही चौथी पुस्तिका असून त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे संचयी नोंदपत्रकही तयार करण्यात येत आहे. या नोंदपत्रकात विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, घरची माहिती त्याचबरोबर त्याची गुणवत्ता याच्या नोंदी करण्यात येणार आहेत. शाळेत दिल्या जाणार्‍या सुविधा, गुणवत्ता विकासावर दिला जाणारा भर याचीही माहिती नोंदविली जाणार आहे असे समजते.

सर्वंकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थी सर्वांगीण विकास याची माहिती देण्यासाठी राज्यातील निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर पुण्यात ११ ते १४ जून या काळात सुरू असून यापूर्वी अशी तीन शिबिरे घेतली गेली आहेत. विद्यार्थी संचय पुस्तिकेतील विद्यार्थ्यांची सर्व माहिती शाळा १५ जूनला सुरू झाल्यानंतर भरली जाणार आहे आणि याच माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना १० आकडी यूआयडी क्रमांक दिले जाणार आहेत असे सांगण्यात आले.