गुरू रामदेवबाबांना मुलायमसिहांचा पाठींबा

नवी दिल्ली दि.१२- योगगुरू रामदेवबाबा यांना काळ्या पैशाविरोधात सुरू करणार असलेल्या मोहिमेस समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांनी पाठींबा
जाहीर केला आहे. राष्ट्रीय राजकारणात सध्या महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या मुलायमसिगांचा पाठींबा ही महत्त्वपूर्ण घडामोड समजली जात आहे. मुलायमसिंग याबाबत म्हणतात की काळ्या पैशाला आमचाही विरोध आहे. या विरूद्ध चळवळ सुरू करण्यात योगगुरू रामदेवबाबा यांनी पुढकार घेतला आहे. त्यांच्या मोहिमेला आमचा पाठींबा आहे.

रामदेव बाबा ९ ऑगस्टपासून काळा पैसा विरोधात देशव्यापी मोहिम हाती घेणार असून त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा पाठींबा आणि समर्थन मिळविण्याच्या मिशनवर आहेत. कालच त्यांनी हैद्राबाद येथे तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांचा पाठींबा मिळविला आहे. नितीन गडकरी आणि राष्ट्रीय लोकदलाचे अजितसिंग यांचाही पाठिबा त्यांनी मिळविला आहे. उद्या ते कदाचित ओरिसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांना भेटणार आहेत.

रामदेव बाबा या भेटीगाठीसंबंधी बोलताना म्हणाले की आम्ही आंदोलन छेडणार आहोत. याबाबत आम्हाला विचारले नाही अशी कोणाची तक्रार नको म्हणून मी सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांच्या भेटी घेत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अपॉईंटमेंट मिळाली असली तरी सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहनसिंग आणि प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment