कलमाडींना महापालिकेत प्रवेशाच्या वेळी मनसे व भाजपा यांनी निदर्शने

पुणे,दि. १२ -ˆ राष्ट्रकुल क्रीडास्पर्धात शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या संशयावरून कॉंग्रेसमधून निलंबित झालेले व सध्या सीबीआयची चौकशी सुरु असलेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना पुणे महापालिकेत प्रवेश करताना कॉंग्रेस, भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांचाच तीव्र विरोध सहन करावा लागला. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आठ महिन्यापेक्षा अधिक काळ तिहारच्या तुरुंगात राहिल्यावर गेले दोन महिने जामिनावर असलेल्या कलमाडी यांनी मुख्य प्रवेश दारात विरोध होतो आहे हे बघितल्यावर अन्य मार्गानी प्रवेश केला व आपण काही वीरश्री जिंकली आहे, अशा पद्धतीने अन्य कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत पक्षातील पेहेलवान कार्यकर्त्यांच्या मागे राहून महापालिका भवनात प्रवेश केला. यावेळी धक्काबुक्की येवढी जोराची झाली की, पोलीसांना हस्तक्षेप करून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगविले.

गेले जवळजवळ वर्षभर तुरुंगात असल्याने या काळात कलमाडी यांचे पुण्याच्या राजकारणातील अस्तित्व  जवळ जवळ संपले होते, तरीही त्यांच्या पाठीशी कॉंग्रेसमधील एक मोठा गट आहे. त्यांच्या पुढे करून कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा आपण बस्तान बसवू पहात आहेत. आज त्यांनी महापालिकेत क्रीडा समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि महापालिका आयुक्तांची भेट असा कार्यक्रम होता. दुपारी बारा वाजल्यापासूनच भाजपा आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर निषेधाचे घोषणा युद्ध सुरु केले होते.

पावणेदोनच्या सुमारास कलमाडी आपल्या समर्थकासह तेथे आले व घोषणायुद्ध सुरु असतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत मार्ग काढला आणि आत गेले. आत गेल्यावर त्यांनी क्रीडाकार्यालयाचे उद्घाटन केले व नंतर ते आयुक्तांनाही भेटले. नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी पुण्याचा जनतेने निवडून दिलेला खासदार आहे. मी माझे काम करत राहणार. मी गेले काही दिवस जरी सक्रीय नव्हतो तरी सर्वांच्या भेटीगाठी होत होत्या. यापुढे मी भेटीगाठी वाढवणार आहे. राजकारणातून निवृत्त होण्याचा कसलाही प्रश्नच उद्भवत नाही. कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत.

कॉंग्रेसचे सर्वच नगरसेवक कलमाडी यांना राजकारणात आणण्यासाठी कटिबद्ध आहेत, असेही कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी यावेळी जाहीरपणे सांगितले. आजच्या कार्यक्रमात शिवसेनेचे कार्यकर्ते कोठे दिसले नाहीत व राष्ट्रवादीचे नगरसेवकही आधीच निघून केले. कॉग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी मात्र कलमाडींचा कॉंग्रेसशी काहीही संबंध नाही, असे सांगितले.