नवी दिल्ली, दि. ११ – सर्व हिंदूंना अत्यंत पवित्र असणार्या कैलास मानसरोवर तीर्थक्षेत्राची यात्रा करणे आता सोपे झाले असून या यात्रेसाठी यात्रेकरूंना परराष्ट्र खात्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.
कमी वेळ आणि पैशात कैलास-मानसरोवर यात्रा
धर्मयात्रा महासंघाने या यात्रेसाठी आता नेपाळमधील मार्ग निवडला आहे. नेपाळमधून कैलास मानसरोवरकडे जाणारा रस्ता खूपच चांगला असून ही यात्रा १२ दिवसांमध्ये होऊ शकते. परराष्ट्र मंत्रालयाकडून कैलास मानसरोवराची जी यात्रा आयोजित केली जाते, त्यास साधारणपणे २६ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच यात्रेकरूंना २५० ते ३०० किमी पायी चालावे लागते. नेपाळमार्गे या यात्रेस जाणार्यांचा हा सर्व त्रास वाचणार आहे. तसेच या यात्रेसाठी नेपाळमार्गे २० ते ३० हजार रूपये कमी खर्च लागणार आहे.
विश्व हिंदू संघटनेने आयोजित केलेल्या या यात्रेसाठीची पहिली तुकडी रविवारी येथून रवाना झाली. या तुकडीचे नेतृत्व विश्व हिंदू संघटनेचे सरचिटणीस दिनेशचंद्र करीत आहेत. १५० यात्रेकरूंची ही तुकडी विमानाने काठमांडूला जाईल. यात्रेकरूंची दुसरी तुकडी २७ जूनला येथून रवाना होणार आहे.
या यात्रेसंदर्भात बोलताना हितेंद्र संगल म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालय जी यात्रा आयोजित करते, त्यासाठी अनेक प्रकारच्या परवानग्या काढाव्या लागतात. तसेच अनेक शारीरिक तपासण्या कराव्या लागतात. पण नेपाळमार्गे जी यात्रा सुरू करण्यात आली आहे, त्यामध्ये केवळ फॅमिली डॉक्टरचे प्रमाणपत्र पुरेसे आहे. विमानाने काठमांडू येथे पोहोचल्यावर येथून पुढचा सर्व प्रवास हा वाहनाने केला जातो. त्यामुळे यात्रेकरूंना शारीरिक त्रास होत नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या यात्रेस प्रत्येक यात्रेकरूस साधारणपणे सव्वा लाख रूपये खर्च करावा लागतो. पण धर्मयात्रा महासंघाने जी यात्रा आयोजित केली आहे, त्यास फक्त ९० हजार रूपये खर्च येतो.
