स्त्रीभ्रुणहत्येच्या वाढत्या प्रकारांनी महाराष्ट्राच्या नावाला अक्षरश: कलंक लागला आहे. महाराष्ट्रात हे प्रकार केवळ वाढतच चालले आहेत असे नाही तर पाडलेल्या गर्भांची अतिशय वाईट पद्धतीने विल्हेवाट लावलेली दिसत आहे. मुळात हा विषयच चिंतेचा झालेला असताना ही निर्दयता दाखवली जात आहे त्यामुळे ही माणसे आहेत की दानव आहेत असा प्रश्न पडतो.
आजवर केवळ भ्रुणहत्या आणि त्याचे प्रमाण, डॉक्टरांची त्याबाबतीतली द्रव्य लालसा, मुलींचे प्रमाण कमी होण्याने होणारे सामाजिक परिणाम असे काही प्रश्न चर्चिले जात होते. पण आता बीड जिल्ह्यात होणारा त्यांता अतिरेक आणि त्यासाठी चालवले जाणारे रॅकेट तसेच त्यात दिसून आलेली डॉक्टरांची गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे सारे सूज्ञ लोक हादरले आहेत.
बीड मध्ये हे सारे प्रकार केवळ डॉक्टरमंडळीच करीत होती असे नाही तर एखादी चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी कार्यरत राहते तशी टोळी राजरोसपणे कार्यरत राहिली. अशिक्षित दरोडेखोरांच्या टोळ्यांना प्रशासनाचे सहकार्य मिळते मग या सुशिक्षित टोळीला ते मिळवण्यात काय अडचण ? त्यांनाही ते मिळाले. डॉ. सानप, डॉ. लहाने आणि डॉ. मुंडे यांचा हा धंदा कायम चालू राहिला. त्यात त्यांनी प्रचंड माया कमवली.
डॉ. सुदाम मुंडे याला शिक्षाही झाली पण तो जामिनावर सुटला. सानप तर शिक्षाही भोगून आला पण तरीही त्यांचे धंदे काही बंद झाले नाहीत. हे असे का होते ? मुंडे याने तर मोठा दवाखाना काढला होता आणि दहा बारा डॉक्टर हाताखाली घेऊन त्याने दररोज पंधरा वीस गर्भपात करण्याचा जणू खाटिक खानाच सुरू केला होता. तो इतका नरराक्षस आहे की त्याने दवाखान्याच्या बाजूला शेत घेतले होते आणि कोवळे गर्भ खायला खास कुत्री पाळली होती.
या डॉक्टरने या धंद्यावर १२५ कोटी रुपयांची मालमत्ता कमावली होती. त्याच्या वाया गेलेल्या मुलाच्या नावावर काही कोटी रुपयांची मालमत्ता आहे. वैद्यकीय व्यवसायात पैसा मिळतो हे खरे आहे पण कसलेही कसब न वापरता इतके साधे काम करून १२५ कोटी रुपयांची मालमत्ता कमावता येते हे कळल्यावर असा हा दुष्ट डॉक्टर आणखी आणखी पैसे कमवायला चटावला नसेल तरच नवल.
केवळ तोच चटावला असे नाही तर त्याचे पाहून इतरही अनेक डॉक्टर लालचावले आणि त्यांनीही लिंगनिदार स्पेशालिस्ट म्हणून काम सुरू केले. या भागातले ऊस तोड कामगार राज्यभर जातात. त्यांच्या त्या विशिष्ट धंद्यामुळे गर्भपात ही त्यांची गरजच होऊन जाते. ही तर गरीब लोकांची गोष्ट झाली. या दुष्प्रवृत्तीच्या बाबतीत सुशिक्षित- अशिक्षित आणि गरीब -श्रीमंत असा काही भेद नाही. सर्वांनाच मुली नको आहेत. त्यामुळे बीड आणि परळी हा भाग याच कामात आघाडीवर राहिला. अनेक डॉक्टर कामाला लागले.
शासन व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा यांना विकत घेण्यात तसा विचार केला तर फार पैसे पडत नाहीत. उलट या नृशंस डॉक्टरांनी याच कारणाने गर्भपाताचे दर वाढवले आणि त्यात हे प्रकार दाबण्याचा एक्स्ट्रॉ चार्ज लावून लोकांना लुबाडले. तोच पैसा यंत्रणेत वाटला. बघता बघता बीड जिल्हा हा ऍबॉर्शन हब झाला. राज्यात अनेक जिल्ह्यात हा संदेश गेला की बीडला जा, तिथे सारे काही बिनबोभाट होते.
त्यामुळे या क्षेत्राचा एक बीड पॅटर्नच तयार झाला. आधी हरियाना, पंजाब, गुजरात या राज्यात हे प्रकार अधिक प्रमाणात होत होते. निदान तसे मानले जात होते. तसे महाराष्ट्रात हे प्रकार होत नव्हते असे काही नाही. परंतु आता महाराष्ट्राची मोठी बदनामी झालेली असून स्त्रीभ्रुणहत्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून यायला लागले आहे. अशा प्रकारांनी खळबळ उडाल्यानंतर शासन जागे झाले आणि हे प्रकार रोखण्यासाठी अधिक कडक उपाय योजण्याच्या दृष्टीने पावले पडायला लागली.
या दुष्प्रवृत्तीचा प्रारंभ सोनोग्राफी यंत्रापासून होतो म्हणून सोनोग्राफी यंत्रे असणार्या डॉक्टरांच्यावर आणि रुग्णालयांवर कडक निगराणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. आता तर सरकारने स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी विशेष पथके नेमण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. या व्यवसायामध्ये भरपूर पैसा कमावण्यास चटावलेल्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या डॉक्टरांनी कायदे, नियम आणि निर्बंध यातील सगळ्या पळवाटा शोधून आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे.
त्यासाठी आता काही डॉक्टरांनी एजंट नेमले आहेत. सरकारने निर्बंध कडक केले, त्यामुळे डॉक्टर घाबरले तर नाहीतच, पण अधिक खूष झाले. कारण या निर्बंधामुळे त्यांचा रेट वाढला. आता सरकार फार कडक नियम करत आहे तेव्हा गर्भपातासाठी जास्त पैसे द्यावे लागतील, असे म्हणून त्यांनी गर्भपाताचे रेट वाढवले आहेत. खरे तर आता तंत्रज्ञानाची प्रगती फार झाली आहे. वाटेल त्या प्रकारांचा छडा लावण्याचे तंत्र शोधून काढण्यात आले आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर याही बाबतीत केला तर या प्रवृत्तीवर प्रभावी उपाय योजिता येईल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी गरोदर महिलांच्या नोंदी ठेवून त्यांच्या प्रसूतीपर्यंत तिचा पाठपुरावा करण्याची यंत्रणा विकसित केली होती आणि तिचा काही फायदा झाला होता अशा यंत्रणा सर्व जिल्ह्यात निर्माण झाल्या पाहिजेत.