एल अँड टी जहाजबांधणी उद्योगास कतारकडून ४८३ कोटींचे कंत्राट

मुंबई, दि. ९ – लार्सन अँड टुब्रो समूहाची उपकंपनी, एल अँड टी शिपबिल्डिंग कंपनीला २०१२-१३ आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत कतार देशाकडून ४८३ कोटी रूपयांचे जहाजबांधणी कंत्राट मिळाले आहे. अत्यंत तीव्र आंतरराष्टीय स्पर्धेला तोंड देवून हे कंत्राट मिळविल्यामुळे एल अँड टी शिपबिल्डिंगची जहाज बांधणीतील क्षमता सिध्द झाली आहे.

एल अँड टी शिपबिल्डिंग कंपनी कतारमधील हलूल ऑफशोअर सर्विसेस कंपनी डब्ल्यू. एल. एल. साठी विशेष प्रकारच्या चार व्यापारी जहाजांची निर्मिती करणार आहे. जहाजांच्या निर्मिती प्रक्रियेत जहाजांची डिझाईन, बांधकाम, चाचण्या आणि प्रत्यक्ष कार्यान्वयन यांचा समावेश आहे. चारपैकी दोन जहाजे प्लॅटफॉर्म सप्लाय व्हेसल्स (पीएसव्ही) प्रकारची आहेत; तर उर्वरित दोन जहाजे अँकर हँडलिग, टोईंग, सप्लाय आणि सप्लाय सपोर्ट (एएचटीएसएसव्हीएस) इत्यादी कामे करण्यासाठी उपयुक्त असलेली जहाजे आहेत.

एल अँड टी शिपबिल्डिंग कंपनीने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हाजिरा येथे जहाजबांधणी आणि पूर्व किनारपट्टीवर कट्टुपल्ली (चेन्नईजवळ ) येथे अतिप्रगत गोदी आणि बंदर उभारले आहे. कट्टुपल्ली येथील गोदी देशातील अशा प्रकारची सर्वात मोठी एकात्मिक गोदी आहे. येथे विशिष्ट प्रकारची व्यापारी जहाजे, ग्राहकांच्या गरजांनुसार खास जहाजे, युध्दनौका आणि पाणबुड्या निर्मिती करण्याची सिध्दता आहे.