महालक्ष्मीच्या दागिन्यांचे मूल्यांकन सरू

कोल्हापूर, दि. ९ – करवीर निवासींनी महालक्ष्मी देवीस भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्यास शुक्रवारपासून येथे सुरूवात झाली. मंदिराच्या इतिहासात प्रथमच गरूड मंडपात दागिन्यांचे मूल्यांकन होत आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख व सचिव हनुमंतराव सूर्यवंशी यांनी दागिन्यांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील शासकीय व्हॅल्यूएटर पुरूषोत्तम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दागिन्यांच्या मूल्यांकनास प्रारंभ झाला. शुक्रवारी खजिन्याच्या एका खोलीतील दागिन्यांची पाहणी करून मूल्यांकन करण्यात आले. त्याची किंमत एक कोटी १८ लाख ७० हजार एवढी झाली. या दागिन्यांमध्ये चार पदरी मोत्यांचा हार, बाजूबंद, ठुशी, सोन्याचा मुकुट, कोल्हापूरी साज, साखळीहार, बोरमाळ, पुतळ्यांचा हार आदी दागिन्यांचा समावेश आहे.

दागिन्यांचे मूल्यांकन होत असताना गरूड मंडप परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मूल्यांकनाचे काम एक आठवडाभर चालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment