उद्योग हब निर्माण करणार – शिवाजीराव मोघे

नागपूर, दि. ८ – शहरात लघु आणि मध्यम तसेच मोठ्या उद्योगांच्या बळकटीकरणाकरिता वेगवेगळे हब आणण्याचा विचार शासन करीत आहे. यात प्रामुख्याने वेअर हाऊसिंग हब व लॉजिस्टिक हब विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उद्योगांबाबत येत्या सहा महिन्यांत खूप मोठे बदल घडून येतील. त्यासाठी लवकरच जिल्ह्यातील मंत्र्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील औद्योगिक विकासासंबंधी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री मोघे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीस विविध २० संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाने नवीन औद्योगिक धोरण आखले आहे. नागपूर जिल्ह्यात औद्योगिक विकास करण्यासाठी बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. देशातील भौगोलिक स्थान लक्षात घेता वेअर हाऊसिंग हब व लॉजिस्टिक हब विकसित करण्याबाबत चर्चा झाली असे मोघे यांनी सांगितले. कृषी उत्पादनासाठी टर्मिनल मार्केट, लघू व मध्यम उद्योगांच्या विकास करण्यासाठी जिल्ह्यातील मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.